Gutkha worth ₹61 lakh seized; case registered against two
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित पानमसाला व गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनावर पोलिसांनी कारवाई करत तब्बल ६१ लाख ५६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (१२ ऑगस्ट) भोकरदन शहराजवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राहुल बांगर यांना खबऱ्याने माहिती दिली की, आयशर वाहनातून प्रतिबंधित गुटखा भोकरदन येथे विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल बांगर व पथकाने सिल्लोड भोकरदन रोडवर साईप्रसाद हॉटेलजवळ खासगी वाहनाने सापळा रचला.
आयशर (क्रमांक आर.जे. ०९ जी.ई. ७४११) या संशयास्पदरीत्या येताना दिसताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून वाहन थांबविले. चालकाकडे वाहनातील मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने वाहनाची झडती घेण्यात आली. त्यावेळी वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, राजनिवास सुगंधित पानमसाला व ZN-1 जाफरानी जर्दा मोठ्या प्रमाणात आढळून आला.
२१ लाखांचा पानमसाला जप्त
झडतीमध्ये २१ लाख ९३ हजार ७५० रुपये किमतीचे १४ हजार ६२५ पुडे पानमसाला, १४ लाख ६२ हजार ५०० रुपये किमतीचे १४ हजार ६२५ पुडे जाफरानी जर्दा तसेच २५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन असा एकूण ६१ लाख ५६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.