

Officials and middlemen getting rich off workers' schemes
संघपाल वाहूळकर
जालना : इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. मात्र, या योजना सरकारी अधिकारी आणि दलालांसाठी कुरण ठरत असल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन सरकारी कामगार अधिकाऱ्यांना परस्पर भांडीसंच विक्री केल्याच्या आरोपावरून परतूर पोलिसांनी अटक केल्याने दलालांचे आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे लोटे असल्याचे उघड झाले आहे. यामुळे सर्वसामान्य कामगारवर्गातून तीव्र चीड व्यक्त होत आहे.
दरम्यान, इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या लाभार्थीसाठी शासनाच्यावतीने महामंडळामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. मात्र, या गोरगरिबांसाठी असलेल्या योजना अधिकारी आणि दलालांसाठी सुगी ठरत आहे. तत्कालीन सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली होती.
त्यांना न्यायालयाने जामीन दिला. असे असले तरी त्यांच्यावर भांडीवाटप संच परस्पर विक्री करून सुमारे १ कोटी ७९ लाख ११ हजार ३६० रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. एकीकडे नोंदणी, नूतनीकरणासासह विविध लाभांसाठी सर्रासपणे दलालांच्या माध्यमातून लाथार्थीना फिफ्टि फिफ्टिचा फॉर्म्युला दिला जात असल्याने या बांधकाम कामगारांची आर्थिक पिळवणूक होत आहे.
सरकारी अधिकारी आणि दलालांच्या विळख्यात इथला कामगार पुरता पिळून निघत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, परतूर, यदलापूर व वाटूर परिसर या तीन ठिकाणांहून कामगारांच्या संसारोपयोगी साहित्याच्या शेकडो किट बाजारात विकल्या असल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला होता.
भांडी संच बेकायदेशीररीत्या वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देणारे अधिकारी अमोल जाधव होते. त्यांनाच आरोपी म्हणून अटक करण्यात आल्याने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली होती. २३ एप्रिल २०२६ रोजी परतूर शहरात पकडलेल्या ट्रकमध्ये नोंदणीकृत १६६ कामगारांसाठी देण्यात येणारे अत्यावश्यक संच आढळून आले.
या संचांची किंमत सुमारे ११ लाख २४ हजार ६५० रुपये, यदलापूर येथे ३३३ संच ५४ लाख ६७ हजार ६० रुपये किमतीचा मुद्देमाल मध्यरात्री विक्रीसाठी घेऊन जात असताना ट्रक पकडण्यात आला. तसेच वाटूर परिसरातील अवैध गोदामामध्ये देखील भांड्याचे संच (किंमत १ कोटी ०८ लाख १९ हजार ६५० रुपये) पकडून तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गैरव्यवहाराची व्याप्ती आणखीन वाढू शकते, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
कथित ३४० बोगस प्रकरणाची तक्रार
दरम्यान, मयत बांधकाम कामगारांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, विवाह सहाय्य अनुदान आदी ३४० बोगस प्रकरण समोर आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात दैठणा बु. येथील ५ व्यक्तींना लाभार्थी दाखवण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ते लाभार्थी त्या गावचे नसल्याचे सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी तक्रारीत नमूद केले. शिवाय, त्यांनी ३५ मृत व्यक्तिच्या नावावर शासकीय लाभाची रक्कम उचलल्याची तक्रार करून जिल्हाभरात ३४० बोगस लाभार्थीनी लाभ घेतला असल्याची तक्रार केली आहे.