Guardian Minister Munde inspected the rain damage, interacted with farmers in Matrewadi area
बदनापूर, पुढारी वृत्तसेवा : बदनापूर तालुक्यातील काही भागांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील सेलगाव सर्कल परिसरातील मात्रेवाडी शिवारात झालेल्या या नुकसानीची पाहणी पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी केली.
यावेळी पालकमंत्री मुंडे यांनी प्रणव चंद्रशेखर घन, जनार्दन तुकाराम मात्रे, विठ्ठल भाऊसाहेब मात्रे आणि एकनाथ तुकाराम मात्रे यांच्या शेतजमिनींमधील सोयाबीन, कापूस, मूग पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शेतात पाणी साचल्यामुळे पिके आडवी झाली असून पुन्हा उभी राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसणार आहे.
या प्रसंगी आमदार नारायण कुचे यांच्यासह उपविभागीय दंडाधिकारी रामेश्वर दौंड, बदनापूर तहसीलदार हेमंत तायडे, तालुका कृषी अधिकारी गोपाल गुजर, तसेच महसूल व कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. याशिवाय भाजपा जिल्हा सरचिटणीस अनिलराव कोलते पाटील, जालना जिल्हा शिवसेना प्रमुख भाऊसाहेब घुगे आदींची उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांच्या या पाहणीमुळे मात्रेवाडी शिवारातील शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला असून शासनाकडून लवकरच नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.