जालना

Jalna farmers news : हिरव्या मिरचीचे आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

मिरची पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव: एक एकर मिरची टाकली उपटून

पुढारी वृत्तसेवा

सादिक शेख

आन्वा : भोकरदन तालुक्यातील आन्वा परिसरात यंदा मोठ्या प्रमाणावर उन्हाळी मिरचीची लागवड करण्यात आली होती. सध्या मिरची पिकांवर विविध रोगांनी हल्ला चढविला असून, शेकडो हेक्टरवरील मिरची पीक शेतकरी उपटून टाकत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, मिरचीचे भाव कमी झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, मिरची तोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मजूर टंचाईचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

यावर्षी उशिरा पावसाचे आगमन झाले असून, वातावरण बदलामुळे मिरचीवर चुरडा-मुरडा आणि बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. या रोगामुळे मिरचीची उत्पादन क्षमता कमी झाल्याने मिरचीची वाढ खुंटली आहे. मिरचीचे उत्पादन कमी असण्यासोबतच प्रत (क्वालिटी) खराब झाल्यामुळे, नाईलाजाने अनेक शेतकऱ्यांनी मिरची पीक उपटून फेकून दिले आहे. शेतकरी मिरची तोडणीसाठी मजुरांना आगाऊ (शिल्लकीचे) पैसे देऊनही मजूर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

सध्या बाजारात मिरची तीन हजार रुपये प्रति क्विंटल विकली जात आहे. भाव कमी असूनही तोडणी न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना अल्प भाव मिळत असूनही मजुरांअभावी त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अडथळा येत आहे. मिरचीची तोडणी आणि इतर कामांसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मजुरांअभावी मिरचीची तोडणी वेळेवर होत नाही, ज्यामुळे मालाची गुणवत्ता घटते आणि नुकसानीची शक्यता वाढते. काही ठिकाणी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे; पण मजुरांअभावी ती तोडता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT