Grant scam: 22 people suspended in Rs 35 crore scam
जालना : सुहास कुलकर्णी
जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदारांचे लॉगिन आणि पासवर्ड वापरून ३५ कोटींचा घोटाळा तलाठी, लिपिकासह कृषी सहायकांनी केला आहे. या प्रकरणात १७ तलाठ्यांसह ५ महसूल कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. घोटाळ्याचे पैसे भरण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी घर, गाडी व इतर वस्तू विकण्याचा सपाटा लावल्याचे पहावयास मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा महाराष्ट्रात गाजत आहे. जालन्यामध्ये शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तहसीलदाराचे लॉगिन आणि पासवर्डचा गैरवापर करून ५७अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तब्बल ३५ कोटींचा अपहार केल्याचे उघडकीस आले आहे. या घोटाळ्याप्रकरणी तहसीलदारांसह ५७कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी विधान परिषदेत दिले आहेत.
जालना जिल्ह्यात २०२२ ते २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलेल्या अनुदान वाटपात गैरव्यवहार असल्याच्या झाला तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने जालना जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती गठीत नेमून अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील गावांची तपासणी केल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. यात सुमारे ३५ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले.
घोटाळ्यात तहसीलदारांचाही समावेश घोटाळ्यात ५ तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा देखील समावेश आढळून आला आहे. त्यांचेदेखील खुलासे मागवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ३५ तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे. चौकशीमध्ये जमीन नसतानाही अनुदान हडपल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
२६ तलाठी आणि १० कृषी सहायक व ग्रामसेवकांवर ठपका ठेवण्यात आला होता. या प्रकरणी सर्वच दोषी तलाठ्यांना ४८ तासांत लेखी खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्यात समाधानकारक उत्तर न मिळाल्याने १० जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. दरम्यान, चौकशी समितीकडून इतर खुलासे तपासण्यात येत आहेत. या कारवाईने गैरप्रकार करणाऱ्या इतरांचेही धाबे दणाणले आहे.