Grand Preparations for the Shri Renuka Devi Yatra Festival
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गांधीनगर भागातील श्री रेणुकादेवी मंदिर संस्थानच्यावतीने सालाबादाप्रमाणे यावर्षीही चैत्र चतुर्थीच्या मुहूर्तावर ५ एप्रिल रोजी भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विशेष समिती गठीत करण्यात आली असून, समितीच्या प्रमुखपदी लखन कणीसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यात्रा महोत्सवाच्या दिवशी सकाळी ७ वाजता देवीचा विधीवत अभिषेक व पूजा करण्यात येणार आहे. गांधीनगरची रेणुका माता ही नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक देवीला नवस बोलतात आणि तो पूर्ण झाल्यानंतर श्रद्धेपोटी बारागाड्या ओढण्याचा संकल्प करतात.
भाविकांच्या संकल्पानुसार एक, तीन किंवा पाच वर्षे याप्रमाणे बारागाड्या ओढण्याची परंपरा येथे जोपासली जाते. हा सोहळा शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल पवार यांच्या अध्यक्षतेखाली भाविकांची महत्त्वाची बैठक पार पडली.
या बैठकीत लखन कणीसे यांची बारागाड्या समिती अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून, समितीमध्ये सदस्य म्हणून राजपाल पारचा, गणेश जल्लेवार, छगन देवरे, मंगेश छाबडा, बबन नामदे, जय छाबडा, रमेश श्रीराम, मनोज यशाल, अजय चलमेट्टी व अशोक वाटसर यांची निवड करण्यात आली आहे. नियोजन बैठकीत यात्रेमध्ये उपस्थितांनी भाविकांचा जास्तीत जास्त सहभाग नोंदवण्यासाठी विविध सूचना केल्या. बारागाड्या ओढणाऱ्या भाविकांनी वेळेचे काटेकोर पालन करावे.