Gram Panchayats used bleaching powder for clean water
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत स्तरावर ब्लिचिंग पावडर खरेदी करून वापराने निर्देश आहे. तरी देखील भोकरदन तालुक्यात ब्लिचिंग पावडरचा वापर कागदोपत्रीच दिसत होता. यामुळे दै. पुढारीने ११ जून रोजी ग्रामपंचायतींना ब्लिचिंग पावडरचा विसर या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करुन या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर या वृत्ताची दखल घेत वाकडी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी ब्लिचिंग पावडर टाकून पाणी शुध्द करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात आला.
दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असताना ग्रामीण भागात पाणी शुद्ध करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन जागरूक नसल्याचे भयावह चित्र पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीमध्ये शासनाची पाणीपुरवठा योजना सुरू आहे. यातील पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली कार्यान्वित आहेत.
मात्र पावसाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील विहिरीमध्ये नवीन पाणी आले आहे. हे पाणी शुद्ध करणे गरजेचे आहे. या पाण्यातून जंतू संसर्ग होऊन साथीचे रोग पसरण्याची भीती असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विहिरी व इतर पाण्याच्या स्रोतामध्ये ब्लिचिंग पावडर टाकल्या जात नसल्याने अनेक गावांमध्ये नागरिकांना अशुद्ध पाणी प्यावे लागत असल्याचे वृत्त दैनिक पुढारीने ११ जून रोजी प्रसिद्ध केली होती, या अनुषंगाने वाकडी ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून काही गावांतील सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीत ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले आहेत.