Graduate constituency election: Administration in the district fully prepared
जालना, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, मतदान केंद्रांवरील सुविधा, मनुष्यबळाचे नियोजन आणि मतदान साहित्याच्या व्यवस्थेबाबत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.
जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्ण कांत कनवारीया, मनपा आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधिक्षक तेगबीर सिंह संधु, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये ८९ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर ३३ हजार १९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये २६ हजार ७३२ पुरुष, ६ हजार ४६३ महिला आणि एका इतर मतदाराचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असून, दुसरे प्रशिक्षण १६ ऑक्टोबर रोजी उपविभागीय अधिकारी स्तरावर पूर्ण झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
तिसरे प्रशिक्षण २२ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांची माहिती देणे आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी त्यांना सज्ज ठेवणे, यावर भर देण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून, अशा केंद्रांना संबंधित अधिकाऱ्यांनी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले.
निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस विभागाने आवश्यक बंदोबस्ताचे नियोजन करावे, असेही ब सांगण्यात आले.
मतपत्रिकेद्वारे मतदान
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे होणार असल्याने मतपत्रिकेच्या वापराबाबत आणि मतदान प्रक्रियेबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर भर देण्यात आला. मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदविताना मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करावे, यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
असे आहेत मतदार
जालना तालुक्यात 24 मतदान केंद्रांवर ८ हजार ५७८ मतदार, बदनापूर तालुक्यात ७ केंद्रांवर २ हजार २४१ मतदार, भोकरदन तालुक्यात १३ केंद्रांवर ४ हजार ४०४ मतदार, जाफराबाद तालुक्यात ७ केंद्रांवर २ हजार ९५१ मतदार, परतूर तालुक्यात ८ केंद्रांवर ३ हजार २१८ मतदार, मंठा तालुक्यात ५ केंद्रांवर १ हजार ९२४ मतदार, अंबड तालुक्यात १५ केंद्रांवर ५ हजार ९६२ मतदार, तर घनसावंगी तालुक्यात १० केंद्रांवर ३ हजार ९१८ मतदार आहेत.