जालना : अंबड येथे शालेय पोषण आहारासाठी उपयोग येणारे गहू व तांदळाचा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्याकरिता अवैधरीत्या साठवलेला साठा असलेल्या पत्र्याच्या गोदामावर कारवाई करताना पुरवठा विभागाचे पथक. pudhari photo
जालना

Jalna Crime: काळ्या बाजारात विक्रीसाठी साठवलेला सव्‍वा सहा लाखांचा गहू अन्‌ तांदळाचा साठा केला जप्त

अंबडमध्ये धान्याच्या काळ्या बाजारावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

जालना : शासकीय योजने अंतर्गत शालेय पोषण आहारासाठी उपयोगात येणारे गहू व तांदळाचा साठा, काळ्या बाजारात बेकायदेशीररीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने पोलिस व महसूल प्रशासनाने संयुक्त कारवाई करत तो जप्त केला. या कारवाईत ६ लाख ३७ हजार ४१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोदाम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

अंबड शहरातील चांगले नगर भागात पुरवठा व महसूल विभागाला गोपनीय माहिती मिळाली की, एका खाजगी पत्र्याच्या गोदामात बेकायदेशीररीत्या धान्याचा साठा करून ठेवला आहे. या माहितीच्या आधारे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय पथकाने पोलिस कर्मचाऱ्यांसह रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास सदर गोदामावर छापा टाकला.गोदामाच्या दरवाजाला कुलूप असल्याने आणि मालक शेख नसीर अब्बास बागवान (रा. अंबड) यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने, पंचासमक्ष गोदामाचे कुलूप तोडून पथकाने आत प्रवेश केला.

तपासणी दरम्यान गोदामात कोणताही वैध परवाना किंवा नोंद नसलेला २ लाख ९७ हजार ७०२ रुपयांचा गहू १८९ गोण्या (एकूण ९४..५० क्विंटल) ,३ लाख ३३ हजार ७१६ रुपयांचा तांदूळ १५२ गोण्या (एकूण ७६ क्विंटल) यास शासकीय धान्य वितरणासाठी वापरली जाणारी ८० रिकामी पोती आणि ६ हजार ५०० रुपये किमतीचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा ६ लाख ३७ हजार ४१८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यांनी केली कारवाई

  • याप्रकरणी तहसील कार्यालय अंबड येथील निरीक्षण अधिकारी किरणकुमार शत्रुघ्न खांडेभराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शेख नसीर अब्बास बागवान याच्याविरुद्ध अंबड पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 आणि 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • सदर कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे हे करत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT