Government job dreams come true; Government appointment orders for 128 compassionate candidates
जालना, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री महोदयांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक-टंकलेखक संवर्गातील १२८ उमेदवारांना शनिवारी शासकीय नियुक्ती आदेशाचे वितरण करण्यात आले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी व्ही-सीद्वारे यात सहभाग घेऊन शासकीय नोकरी मिळालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले.
अनुकंपा नियुक्ती प्रक्रियेस गती आणून पात्र उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश असलेल्या या कार्यक्रमातंर्गत अनुकंपा नियुक्ती (गट-क व गट-ड) उमेदवार व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस प्राप्त लिपिक टंकलेखक संवर्गातील एकूण १२८ उमेदवारांना नियुक्ती आदेशाचे वितरण शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी १२८ उमेदवारांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले.
अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आ. अर्जुन खोतकर, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
शासकीय सेवेत कार्यरत असताना अधिकारी व कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबीयांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे सुधारित धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने पारित केले होते.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मागील महिन्यात झालेल्या मेळाव्यात उमदेवारांना शासन निर्णय व नियुक्ती प्रकियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात अनुकंपा तत्त्वावर गट 'क' आणि गट-'ड' पदासाठी प्रतीक्षा यादीतील ७९ उमेदवारांची, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनही ४९ उमेदवारांची नियुक्तीकरिता शिफारस करण्यात आली आहे. १२८ उमेदवारांना नियुक्तीपत्रे यावेळी देण्यात आली.
पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दृक्श्राव्य प्रणालीद्वारे सहभागी होत नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. अतिवृष्टी कामात मदतीसह जिल्हा प्रशासनाचा प्रत्येक कामात नेहमी पुढाकार असल्याबद्दल त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.