Shahagad Fog Accident 
जालना

Shahagad Fog Accident | शहागड येथील गोदावरी उड्डाणपुलावर दाट धुक्यामुळे भीषण अपघात; तरुण गंभीर जखमी

Shahagad Fog Accident | दुचाकीस्वाराची प्रकृती गंभीर : एक पाय निकामी, दुसरा मोडलादुचाकीसह भांडी साहित्याचे मोठे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

अकबर शेख – शहागड प्रतिनिधी

अंबड तालुक्यातील शहागड येथे शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास गोदावरी नदीवरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 च्या उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार दिलीप बाबुलाल गायकवाड (वय 24, रा. जालना) हा गंभीर जखमी झाला. जालन्यातील गरीब व हेतकरी कुटुंबातील दिलीप गायकवाड भांडी साहित्य विक्रीसाठी दुचाकी (क्र. MH-05 BC-5645) वर माल लादून आपल्या अन्य सहकाऱ्यासह बीडकडे निघाले होते.

त्याचवेळी गुजरात राज्याकडून हैदराबाद (तेलंगणा) कडे साबणाचे सामान घेऊन जाणारा कंटेनर (क्र. TS-07 UE-3176) प्रचंड धुक्यामुळे समोरची परिस्थिती लक्षात न आल्याने दिलीप गायकवाड यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. पुलाच्या सुमारे अर्ध्या किलोमीटर परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पथदिवे बंद असल्याने दाट धुक्यात दृष्टीआड परिस्थिती निर्माण झाली होती.

धडकेत दुचाकीस्वाराचा पाय कंटेनरच्या दुसऱ्या टायरमध्ये अडकला. या भीषण अपघातात त्याचा एक पाय जागीच चेंदामेंदा (निकामी) झाला असून दुसऱ्या पायासह शरीराच्या अनेक भागांवर गंभीर जखमा झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) रुग्णवाहिकेने त्याला तातडीने बीड येथे व नंतर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.

सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांना ही घटना दिसताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच त्याच्यासोबत भांडी विकणाऱ्या इतर दुचाकीस्वारांनीही मदत करत ट्रकखालून जखमीस बाहेर काढले.

शहागड पोलीस चौकीचे पोलीस जमादार रामदास केंद्रे यांनी घटनास्थळी येऊन कंटेनर चालक रेवंद्र सिद्धाप्पा अण्णाप्पा मंधाळ याला ताब्यात घेतले आणि ट्रक पोलिस चौकीत जमा केला. दिलीप गायकवाड हा अत्यंत गरीब पार्श्वभूमीतील तरुण असल्याने त्याच्या नातेवाइकांनी पोलिस चौकीत धाव घेऊन तातडीच्या आर्थिक मदतीची मागणी केली आहे. वेळेवर मदत मिळाल्यास युवकाचे प्राण वाचण्याची शक्यता वाढेल, असे ते म्हणाले.

पथदिवे बंद असल्याने अपघात?

अपघात दाट धुके आणि राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते जुनेद तांबोळी यांनी संबंधित विभागाने पथदिवे रात्रीपासून सूर्योदयापर्यंत सुरू ठेवावेत, अशी मागणी केली आहे. अन्यथा पाडळसिंगी टोलनाक्यावर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दाट धुक्यात वाहनचालकांनी घ्यावयाची काळजी

पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत गोदावरी पुल परिसरात दाट धुके असते. त्यामुळे

  1. चारचाकी, अवजड वाहने तसेच दुचाकीस्वारांनी

  2. वाहनाचे हेडलाईट व इंडिकेटर सुरू ठेवावेत

  3. वेळोवेळी हॉर्न द्यावा

  4. आपल्या लेनमध्येच वाहन चालवावे

  5. पुढील व मागील वाहनामध्ये अंतर ठेवावे

  6. वाहनाचा वेग कमी ठेवावा

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांनीही आसपास वाहने येत आहेत का याची खात्री करूनच चालावे, अशी दक्षतेची सूचना गोंदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर यांनी दैनिक पुढारीशी बोलताना दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT