

Three more people arrested in Bhokardan abortion case
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा :
भोकरदन तालुक्यातील नांजावाडी शिवारातील अवैध गर्भ लिंगनिदान व गर्भपात प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी (दि.२८) दोन मेडिकल दुकनदारासह तीन आरोपींना अटक केली. यातील दोन आरोपींना भोकरदन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोन दिवसापूर्वी उजेडात आलेल्या या प्रकरणात आता पकडलेल्या आरोपींची संख्या आता पाच झाली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांनी दिली. नव्याने अटक करण्यात आलेले आर ोपीतील अनंता भिकाजी चौबे (५३) यांचे शहरात चौबे मेडिकल एजन्सी नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाची पोलिसांनी झडती घेतली. गर्भपातासाठी लागणारी औषधे, गोळ्या एजन्सीकडून घेतल्याचे अटकेतील आरोपीने सांगितल्यावर चौबे यांना अटक करण्यात आली.
याशिवाय बुलढाणा जिह्यातील धाड येथील मेडिकल एजन्सी चालक योगेश सुकलाल चांदा (३०, रा. चांडोळ, जि. बुलढाणा) याच्याकडून औषधी घेतल्याचे सांगितल्यामुळे त्यास पोलिसांनी पकडले. दरम्यान भोकरदन येथील प्रकारामुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शेतातील गोठघात अशा प्रकारचा गर्भपात हा महिलांच्या आरोग्यालाही घातक ठरू शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे डॉक्टर असणाऱ्या एका व्यक्तीचा यात सहभाग असावा याबद्दल आश्यर्च व्यक्त होत आहे. बारावी झालेल्या एका युवकाला हाताशी धरून होत असलेला प्रकार संतापजनक असून, दोर्षीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी के ली जात आहे.
शेतमालकाला पकडले
गवळीवाडी येथील समाधान सोरमारे यांच्या शेतातील गोठ्यात गर्भपाताचे केंद्र चालत होते. घटना उजेडात आल्यापासून सोरमारे हे पोलिसांना गुंगारा देत होते. परंतु त्यांनाही शुक्रवारी पकडण्यात आले. त्यांची जबानी घेतल्यानंतर या कृत्यात आणखी कोण सहभागी होते, याची माहिती मिळू शकेल, असे पोलिसांना वाटते.