Girl kidnapped and forced into marriage
शहागड, पुढारी वृत्तसेवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका तरुणीला कारमध्ये बसवून तिचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देऊन आळंदी येथे नेऊन तिचे बळजबरीने लग्न लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून गोंदी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, अंबड तालुक्यातील शहागड जवळील एका गावातील २२ वर्षीय तरुणी दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहागड येथे येते. २१ जानेवारी रोजी सकाळी ती नेहमीप्रमाणे बसस्थानकावर उभी असताना, नातेवाईक असलेले आरोपी महेश राजेंद्र काकडे, सोनू राजेंद्र काकडे यांच्यासह दोन महिला (रा. सारंगपूर, ता. अंबड) त्या ठिकाणी कार घेऊन आले. त्यांनी तरुणीला बळजबरीने कारमध्ये बसवले.
विशेष म्हणजे पीडिता आणि आरोपी हे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीने जाण्यासाठी विरोध केला असता, आरोपींनी तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि थेट आळंदी येथे नेले. त्या ठिकाणी तिची इच्छा नसतानाही आरोपींनी तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. या प्रकारानंतर पीडितेने गोंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.