Ghansawangi The fields are bustling with activity amidst the drizzling rain
घनसावंगी, पुढारी तालुक्यात पडलेल्या रिमझिम पावसामुळे शेत शिवारात पुन्हा चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यात कापूस व तूर लागवडीच्या कामांना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दिलासा मिळाला असून शेतात मशागत आणि पेरणीपूर्व कामांची लगबग वाढली आहे.
जून महिना संपत येऊनही तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नसल्याने खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता होती. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे, खते आणि मशागतीची तयारी पूर्ण करून ठेवली होती; मात्र जमिनीत आवश्यक ओलावा नसल्याने पेरणी व लागवडीची कामे रखडली होती. बुधवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीच्या वरच्या थरात पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी कापूस व तूर लागवडीची कामे सुरू केली आहेत.
तालुक्यातील विविध भागांत ट्रॅक्टरच्या साहाय्याने वखरणी, सरी काढणे आणि पेरणीची तयारी सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी बैलजोड्यांच्या मदतीनेही लागवडीची कामे सुरू असून शेतामध्ये पारंपरिक शेती संस्कृतीचे दर्शन घडत आहे. बैलांच्या गळ्यातील घुंगरांच्या मंजुळ नादाने शिवार दुमदुमून गेले असून त्या तालावर महिला व पुरुष शेतकरी उत्साहाने लागवडीची कामे करताना दिसत आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत असून शिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतांमध्ये महिला-पुरुषांची वाढलेली वर्दळ, मशागतीची लगबग आणि बैलांच्या घंट्यांचा निनाद यामुळे पावसामुळे ग्रामीण भागाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. सध्या झालेल्या पावसामुळे लागवडीला अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
पावसाची प्रतीक्षा
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. रिमझिम सरींमुळे कापूस व तूर लागवडीला वेग आला असला, तरी खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने बळ मिळण्यासाठी समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.