घनसावंगीः श्री गणेशाचे आगमण अवघ्या काही दिवसांवर आले असतानाच गणेश मूर्तीवर अखेरचा हात फिरवताना मूर्तिकार.  (छायाः अविनाश घोगरे )
जालना

Ganesh Festival 2026 : रंगांच्या कुंचल्यातून साकारतोय गणराय

गणेशमूर्ती बनविण्यासाठी कारागिरांची दिवसरात्र धडपड!

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी : घनसावंगी तालुक्यात गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, भक्तांच्या घरात आणि मंडपात विराजमान होणाऱ्या गणरायाच्या मूर्तींना अंतिम रूप देण्यासाठी मूर्तिकार आणि कारागिरांची अक्षरशः रात्रंदिवस धडपड सुरू आहे. कुठे डोळ्यांमध्ये भाव उतरविण्याचे काम सुरू आहे, तर कुठे मुकुट, दागिने आणि वस्त्रांवर रंगांचा शेवटचा हात फिरविला जात आहे.

गणेशमूर्ती तयार करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मूर्तिकार आणि कामगारांची मेहनत सुरू आहे. आता गणेशोत्सव अगदी तोंडावर आल्याने कामाचा वेग प्रचंड वाढला आहे. सकाळपासून सुरू झालेले रंगकाम रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असून, अनेक कारागीर तब्बल बारा ते अठरा तास कुंचला हातात घेऊन गणरायाचे रूप खुलविण्यासाठी मेहनत घेत आहेत.

मातीला आकार देऊन तयार झालेली मूर्ती रंगांच्या कुंचल्यातून जिवंत भासावी, यासाठी प्रत्येक बारकाव्याकडे लक्ष दिले जात आहे. गणरायाचे डोळे, चेहऱ्यावरील भाव, मुकुट, दागिने, वस्त्र आणि अलंकार रंगविताना कारागिरांची नजर क्षणभरही हटत नाही. एका छोट्याशा चुकीने संपूर्ण मूर्तीच्या सौंदर्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे थकवा जाणवत असला तरी कारागीर काम थांबवित नसल्याचे चित्र कारखान्यांमध्ये पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या पसंतीच्या मूर्तींचे बुकिंग यापूर्वीच केले आहे. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांकडूनही मूर्ती तयार झाल्या की नाही, याची विचारणा सुरू आहे.

आतुरता वाढली

अंतिम रंगकाम पूर्ण झाल्यानंतर गणरायाच्या मूर्ती कारखान्यांतून मंडप आणि घरांकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे आता कारागिरांच्या कुंचल्यातील प्रत्येक रंगरेषेतून भक्तांना आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घडण्याची आतुरता अधिकच वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT