Ghansawangi Facebook friendship pudhari photo
जालना

Jalna News : सोशल मीडियावर जुळले बहीण भावाचे नाते

चार वर्षांपासून राखीच्या धाग्याने जपली आपुलकी

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी : आजच्या सोशल मीडियाच्या युगात फेसबुक, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून क्षणात अनेक अनोळखी व्यक्तींशी ओळख होते. काही ओळखी केवळ आभासी जगापुरत्याच मर्यादित राहतात; तर काही ओळखी काळाच्या ओघात विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकीच्या नात्यात रूपांतरित होतात. घनसावंगी येथील फेसबुकवरून झालेल्या एका ओळखीचे असेच बहीण-भावाच्या नात्यात रूपांतर झाले असून, गेल्या चार वर्षांपासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने या नात्याची वीण अधिक घट्ट होत आहे.

पुणे येथे वास्तव्यास असलेल्या रूपाली खिरिड या गेल्या चार वर्षांपासून रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावासाठी न चुकता राखी पाठवितात. पुण्यासारख्या मोठ्या शहरातील धावपळ, घरच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळतानाही रक्षाबंधनाच्या आठ-दहा दिवस आधीच राखी पाठविण्याचे नियोजन केले जाते. राखी वेळेत भावापर्यंत पोहोचावी, याचीही त्या आवर्जून काळजी घेतात.

फेसबुकवरून सुरू झालेली ही ओळख सुरुवातीला केवळ सोशल मीडियापुरतीच होती. मात्र, संवाद वाढत गेला तसे त्यातून आपुलकी निर्माण झाली. हळूहळू या ओळखीचे रूपांतर ताई-भावाच्या नात्यात झाले. प्रत्यक्ष भेटीच्या संधी कमी असल्या, तरी एकमेकांप्रती असलेला विश्वास आणि जिव्हाळा मात्र दिवसेंदिवस वाढत गेला.

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा जवळ राहणाऱ्या व्यक्तींनाही एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. संपर्काची साधने वाढली असली, तरी नाती जपण्यासाठी मनापासून प्रयत्न करण्याची गरज असते. अशा परिस्थितीत फेसबुकवरून सुरू झालेल्या या ताई-भावाच्या नात्याने सोशल मीडियाचा सकारात्मक वापर नाती जोडण्यासाठी आणि ती जपण्यासाठी कसा करता येतो, याचा सुंदर प्रत्यय दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT