Jalna Agriculture News  pudhari photo
जालना

Jalna Agriculture News : जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर

घनसावंगी : तालुक्यातील बळीराजा संकटात, पिके जळाली

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी : पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतशिवार कोरडेठाक पडले असून दुष्काळाची झळ आता थेट पशुधनाच्या जिवावर आली आहे. शेतातील हिरवा चारा करपला, पाणवठे आटले आणि चारा-पशुखाद्याचे दर वाढल्याने जनावरे जगविण्याचे मोठे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. पिके वाचविण्यासाठी धडपडणारा शेतकरी आता पोटच्या लेकरांप्रमाणे जपलेल्या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची जुळवाजुळव करताना अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतातील चारा संपुष्टात आला आहे. बांध, नाले, तलाव आणि शेततळी आटत चालल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. काही ठिकाणी जनावरांना पाणी पाजण्यासाठी दूरवर जावे लागत असून, चारा मिळविण्यासाठीही शेतकऱ्यांना वणवण भटकावे लागत आहे. सकाळपासून जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करण्यातच शेतकऱ्यांचा मोठा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.

हिरवा चारा उपलब्ध नसल्याने कडबा, वैरण आणि पशुखाद्य खरेदी करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे. आधीच शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची परिस्थिती नसताना पशुधनाच्या संगोपनाचा वाढता खर्च शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवत आहे. चाऱ्याअभावी दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनावरही परिणाम होत असून, एकीकडे उत्पन्न घटत असताना दुसरीकडे खाद्याचा खर्च वाढत आहे. त्यामुळे पशुपालक दुहेरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

जनावरे जगविण्यासाठी शेतकरी रोज धडपड करीत असले तरी परिस्थिती आणखी बिकट झाली तर जनावरे विकण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, दुष्काळी परिस्थितीत बाजारात जनावरांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने विक्री केली तरी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनावरे विकावीत की पदरमोड करून सांभाळावीत, अशा दुहेरी कात्रीत पशुपालक अडकले आहेत.

“शेतातले पीक गेले तरी जनावरं तरी वाचली पाहिजेत. जनावरं जगली तर पुन्हा संसार उभा करता येईल; पण रोज त्यांच्यासाठी चारा आणि पाणी कुठून आणायचे, हा मोठा प्रश्न आहे,” अशी व्यथा पशुपालक शेतकरी व्यक्त करीत आहेत. अनेक ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाचा आधार दूध व्यवसायावर आहे. त्यामुळे पशुधन हातातून गेले तर शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची भीती आहे.

दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने पशुधनासाठी तातडीने चाऱ्याची उपलब्धता करावी, गरज असलेल्या गावांत चारा छावण्या सुरू कराव्यात तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. शेतीपिकांबरोबरच पशुधनही वाचविणे गरजेचे असून, जनावरे जगली तरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार मिळणार आहे. त्यामुळे पशुधनाच्या चारा-पाण्याच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

“ना बांधावर चारा राहिला, ना शेतात चारा राहिला. जनावरांना काय खाऊ घालायचं आणि पाणी कुठून आणायचं, हा रोजचा प्रश्न झाला आहे. बाहेरून चारा विकत घेणं आता परवडत नाही. जनावरं आमच्या कुटुंबाचा आधार आहेत; त्यामुळे प्रशासनाने वेळ न दवडता चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पाण्याचीही व्यवस्था करावी.”
विकास तळपे, पशुपालक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT