Ghansavangi Heatwaves : उष्णतेच्या झळांनी घनसावंगीकर त्रस्त file photo
जालना

Ghansavangi Heatwaves : उष्णतेच्या झळांनी घनसावंगीकर त्रस्त

तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे

पुढारी वृत्तसेवा

Ghansavangikar suffers from heatwaves

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट कायम असून वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मे महिन्याच्या अखेरीस उन्हाचा तडाखा अधिकच वाढला असून बुधवारी घनसावंगी तालुक्यात तापमान ४२ अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले. सकाळीच कडक उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत असून अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

उष्णतेच्या वाढत्या लाटेंमुळे शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार तसेच दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतातील कामे सकाळी आणि सायंकाळी केली जात असून दुपारच्या वेळेत शेतात काम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक सावलीचा आधार घेताना दिसत आहेत.

तालुक्यातील बाजारपेठांवरही उष्णतेचा परिणाम जाणवत आहे. दुपारच्या वेळेत ग्राहकांची वर्दळ कमी होत असून व्यापाऱ्यांनाही मंदीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे थंड पेये, लिंबूपाणी, उसाचा रस, आईस्क्रीम आणि पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरातील थंड पेयांच्या दुकानांवर दिवसभर नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे.

वाढत्या तापमानामुळे वीज वापरातही मोठी वाढ झाली असून काही ग्रामीण भागात कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. अनेक ठिकाणी दुपारच्या वेळेत वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

सरकारीसह खासगी दवाखान्यांत उष्माघात, अंगदुखी, डोकेदुखी, तापेचे रुग्ण उपचारासाठी गर्दी करीत आहेत.

खबरदारी घ्या

हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT