Gaurai is worshipped in every household; immersion today
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा: गौराईंचे घरो घरी मंगळवारी सोनपावलांनी आगमन झाले. 'पायात पैंजण छुम, छुम करत गौराई आली सोन पावलांनी' असे म्हणत महिलांनी गौराईचे उत्साहात स्वागत केले. बुधवारी माहेरवासीण म्हणून आलेल्या गौराईंचे पूजन थाटात झाले. गुरुवारी गौराईंचे विसर्जन होणार आहे.
घरोघरी गणेशाचे २७ ऑगस्ट रोजी आगमन झाल्यानंतर ३१ रोजी तीन दिवसांची पाहुणी माहेरवासीण म्हणून गौराईंचे घरोघरी आगमन झाले. गौरी आगमनामुळे महिला वर्गात उत्साह संचारल्याचे चित्र आले. मंगळवारी सकाळ पासूनच गौराईंच्या स्वागताची लगबग झाल्यानंतर बुधवारी गौराई पूजन करण्यात आले.
गौरी बसवण्याच्या पद्धती सर्व घरांमध्ये वेगळ्या आढळतात. काही ठिकाणी गौरी पाटावर विराजमान होतात. तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. विशेष बाब म्हणजे मंडप, लायटिंग व डेकोरेशनही यावेळी मोठ्या प्रमाणात केले जाते.
पहिल्या दिवशी गौरी आवाहन, दुसऱ्या दिवशी गौरी पूजन तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन केले जाते. गौरी पूजनाच्या दिवशी नातेवाईकांना जेवण्यासाठी बोलावण्यात आले होते.