Gang that blackmailed victims using obscene photos busted
जालना, पुढारी वृत्तसेवा अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीच्या चंदनझिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून सुमारे ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की अश्लील फोटो काढून बदनामीची धमकी देत पैसे व सोन्याचे दागिने उकळणाऱ्या एका ब्लॅकमेलर टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात स्वतःला 'रिलस्टार' म्हणून ओळख निर्माण केलेली एक महिला, दोन पुरुषांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोर्पीकडून ३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाने त्यांना १७जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, जालना शहरातील नवीन मोंढा परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीची महिला आरोपीशी नुकतीच ओळख झाली होती. घर दाखविण्याच्या बहाण्याने तिने संबंधित व्यक्तीला आपल्या घरी बोलावले. तेथे तिच्या तीन साथीदारांच्या मदतीने तक्रारदाराला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची व बदनामी करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्यात आले.
या धमक्यांच्या जोरावर आरोपींनी तक्रारदाराकडून ७५ हजार रुपये रोख तसेच अंदाजे दोन तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या अंगठ्या खंडणी स्वरूपात उकळल्या. या गंभीर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेगबीरसिंह संधू आणि अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली. पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे १४ जुलै रोजी मुख्य महिला आरोपीला हिला मंठा रोड परिसरातून ताब्यात घेतले. सखोल चौकशीत महिलेने आपल्या साथीदारांची नावे उघड केली. त्यानंतर पोलिसांनी राम राजू पाटोळे (आर.आर.) आणि अनिकेत प्रशांत कसबे यांना शिताफीने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याच्या अंगठ्या, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल फोन, दोन दुचाकी आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, अपर पोलीस अधिक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधीकारी अनंत कुलकर्णी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोउपनि निता दामथर, पोहेकों कृष्णा तंगे, राजु पवार, अभिजीत वायकोस, नवनाथ पाटील, सागर खैरे महीला पोलीस ज्योती राजपुत व स्थागुशाचे पोहेका सागर बावस्कर यांनी केली आहे.
बदनामीच्या भीतीने तक्रार उशिराने दाखल
विशेष म्हणजे हा प्रकार २ जून २०२६ रोजी घडला होता. मात्र, बदनामीच्या भीतीने तक्रारदाराने तक्रार देण्याचे धाडस केले नव्हते. काही आठवड्यांपूर्वी अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सपना निकाळजे व तिच्या टोळीला चंदनझिरा पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर तक्रारदाराने पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी त्यांना धीर देत कायदेशीर मार्गदर्शन केल्याने त्यांनी अखेर तक्रार दाखल केली आणि या ब्लॅकमेलर टोळीचा पर्दाफाश झाला.