Jalna News : बनावट एसएसआरपी नंबर प्लेट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त ! file photo
जालना

Jalna News : बनावट एसएसआरपी नंबर प्लेट बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ३.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त !

चोरीच्या मोटारसायकलला बेकायदेशीरपण बनावट एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नंबर प्लेट बनवून देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gang making fake HSRP number plates busted

जालना, पुढारी वृत्तसेवा : चोरीच्या मोटारसायकलला बेकायदेशीरपण बनावट एचएसआरपी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) नंबर प्लेट बनवून देणाऱ्या रॅकेटचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत बनावट नंबर प्लेट तयार करणाऱ्या दोन दुकानदारांसह चोरीची गाडी बाळगणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३ लाख ३६ हजार ८५० रुपयांचे नंबर प्लेट बनवण्याचे साहित्य, मशिनरी आणि एक चोरीची मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

रविवार, दि. १८ रोजी एलसीबीचे पथक शोध मोहिमेवर असताना, संजयनगर येथील शेख राजेक शेख मुबारक (वय २६) हा त्याच्या तावडीतील हौंडा शाईन मोटारसायकलला बनावट एचएसआरपी नंबर प्लेट लावून फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.

अधिक चौकशी केली असता ही बनावट एचएसआरपी नंबर प्लेट रॉयल रेडियमचा मालक शेख परवेज शेख गणी (वय ३६, रा. शेरसवारनगर, जालना) आणि एस.एन. तंत्रज्ञानाचा मालक राहुल पंढरीनाथ मुनेश्वर (वय ४०, रा. चंदनझिरा, जालना) यांनी बनवून दिल्याचे आरोपीने सांगितले.

याप्रकरणी कदिम पोलिस ठाण्यात शेख राजेक शेख मुबारक (वय २६, रा. संजयनगर, जालना) याच्यासह शेख परवेज शेख गणी (वय ३६, रा. शेरसवारनगर, जालना), राहुल पंढरीनाथ मुनेश्वर (वय ४०, रा. चंदनझिरा, जालना) आणि सैय्यद अल्ताफ सय्यद अहेमद (वय २४, रा. नॅशनल नगर, जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजूर येथून चोरली होती मोटारसायकल

आरोपी शेख राजेक याच्याकडे मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता, त्याने ही गाडी सन २०२४ मध्ये सय्यद अल्ताफ सैय्यद अहेमद (वय २४, रा. नॅशनल नगर) व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाकडून विकत घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, ही गाडी २०२४ मध्ये राजूर येथून चोरल्याचे उघड झाले असून याबाबत हसनाबाद पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT