Jalna Water Shortage pudhari photo
जालना

Jalna Water Shortage : गल्हाटी प्रकल्प कोरडा पडल्याने शहापूरकरांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

परिसरातील गावांची परवड, सार्वजनिक पाणीपुरवठा झाला ठप्प

पुढारी वृत्तसेवा

शहापूर : अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील गल्हाटी मध्यम प्रकल्प यंदा पूर्णपणे कोरडाठाक झाला आहे. प्रकल्पात एकही थेंब पाणी नसल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शहापूर गावाचा सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला आता टँकरद्वारे गावातील सार्वजनिक विहिरीत पाणी टाकून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

गतवर्षी तुडुंब भरून ओव्हरफ्लो झालेला हा प्रकल्प यंदा मात्र कोरडाठाक पडल्याने,पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन तहसील प्रशासनाने शहापूर गाव टंचाईग्रस्त म्हणून घोषित करून टँकर योजना सुरू केली आहे. रोज सकाळ-संध्याकाळ दोन टँकरद्वारे पाणी आणून ते गावातील सार्वजनिक विहिरीत सोडले जाते. त्यानंतर गावकऱ्यांना पाणी पुरवठा केला जात आहे परंतु शहापूर गावची लोकसंख्या ही जवळपास चार हजारांच्या आसपास असल्याने हे पाण्याचे टँकर अपुरे पडत आहेत.

पावसा अभावी आणि उन्हाळा लवकर सुरू झाल्याने पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमधील नद्या, ओढे, बोअर आणि सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्याने अखेर प्रशासनाला टँकरद्वारे सार्वजनिक विहिरींमध्ये पाणी सोडण्याची वेळ आली आहे.

यंदा कमी पावसाअभावी सार्वजनिक पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्यायत. त्याचबरोबर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाणी प्रकल्पातच खोदलेल्या विहिरीदेखील आटल्यानं ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.त्यामुळे आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? असा प्रश्न ग्रामस्थांना पडायला सुरुवात झाली असली तरीही येणाऱ्या काळात पाणीप्रश्न बिकट होणार आहे.

महिन्याला लाखांचा बोजा

प्रशासनाच्या माहितीनुसार एका टँकर फेरीसाठी साडेतीन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे फक्त शहापूर गावासाठीच महिन्याला लाखो रुपये टँकरवर खर्च होत आहेत. सध्या हा खर्च हिवाळ्यात आहे अजून उन्हाळ्याच्या झळा बाकी असताना उन्हाळ्यात पाणी दुप्पट तिप्पट लागते चार खेपांवर भागणार नाही आताच गावात कुठे पाणी कुठे मिळत नाही एप्रिल_मे महिन्यामध्ये टंचाई आणखी तीव्र होऊन खर्चही दुप्पट वाढणार आहे.

चार ट्रॅंकरच्या खेपाने तहान भागेना- गल्हाटी मध्यम प्रकल्पात सध्या २ टँकरच्या ४ फेऱ्या पाणी आणून टाकलं जातं.मात्र तरीही ग्रामस्थांची पाण्याची गरज पूर्ण होत नाहीय.पाण्यासाठी गावातील सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी महिला येऊन पाण्याची वाट पाहत उभ्या राहतात.दररोजची पाण्याची गरज भागविण्यासाठी आणखी टँकर वाढून देण्याची मागणी प्रशासनाकडे गावकऱ्यांनी केली.
दशरथ साठे, माजी सरपंच, शहापूर
विहीर कोरडी पडल्याने ट्रॅंकरने पाणीपुरवठा- यंदा या भागात समाधानकारक पाऊस झाला नाही.त्यामुळे गल्हाटी मध्यम प्रकल्पात पावसाचं पाणी साठलं नाही.गेल्यावर्षी हा प्रकल्प ओसंडून वाहत होता.मात्र यंदा तोच प्रकल्प कोरडाठाक पडलाय.त्यामुळे शहापूर गावाला पाणीपुरवठा करणारी सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडली आणि याच विहिरीत टॅंकर आणून टाकण्याची वेळ आली.
दत्ता शिंदे,ग्रामस्थ,शहापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT