Housing Scheme : घरकुलाला निधी अपुरा; कर्जाच्या पैशावर लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम सुरू file photo
जालना

Housing Scheme : घरकुलाला निधी अपुरा; कर्जाच्या पैशावर लाभार्थ्यांच्या घरांचे बांधकाम सुरू

भोकरदन : १२ हजार घरकुल मंजूर

पुढारी वृत्तसेवा

Funds for the housing scheme are insufficient; Construction of houses for beneficiaries begins with loan money

भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक बेघर असलेल्या गरीब व्यक्तीला घरकुल देण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरकुल योजना सुरू आहेत. घरकुल लाभार्थ्यांना जवळपास दीड ते दोन लाख रुपये मिळतात. मात्र महागाईच्या काळात दीड लाखात घरकुल बांधणे अवघड जात असल्याने लाभार्थ्यांना पतसंस्था, फायनान्स कंपनी व बँकेकडून कर्ज काढून घराचे बांधकाम पूर्ण करावे लागत असल्यामुळे घरकुलधारक कर्जबाजारी होत असल्याचे दिसून येत आहे.

भोकरदन तालुक्यासाठी १२ हजार घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. तालुक्यात मोठ्या संख्येने घरकुल बांधकाम सुरू आहेत. लाभार्थ्यांना वीट, खडी, वाळू, सळई, समेंट, मिस्त्री व मजुरांची वाढलेली मजुरी देताना दमछाक होते. शासनाकडून घरकुलासाठी स्वस्तात वाळू मिळवून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. परंतु त्याचा लाभ सर्वांना मिळा लेला नसल्याचे तालुक्यातील चित्र आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना वाळू वाढीव दराने विकत घ्यावी लागत आहे. परिणामी घरकुलासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने गरीब घरकुल लाभार्थी कर्जबाजारी झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सद्यस्थितीत शासनाच्या पंतप्रधान आवास योजना, आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना आरटी आवास योजना अमलात आहेत आणि या सर्व घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना प्रशासन केवळ दीड लाख रुपये रक्कम देण्यात येते. ही रक्कम ३ ते ४ हप्त्यांमध्ये दिली जाते. प्रशासनाकडून बिल काढत असताना प्रत्येक वेळी जवळचे पैसे खर्च करावे लागतात. अशा परिस्थितीत कमी निधीतून लाभार्थ्यांना घरकुलाचे बाधकाम करणे कसरतीचे काम झाले आहे.

लाभार्थ्याला प्रत्येक हप्ता काढण्यासाठी अभियंत्यासह इतर अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागते. सोयगाव, जोमाळा, गारखेडा, फत्तेपूर, या परिसरातील अभियंत्यांना स्पॉट पाहणी करण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. मोबाईल वर व्हॉट्सअॅपद्वारे फोटो मागवले जात आहेत. काही वेळा ते रिजेक्ट केले जात आहे. एकदा रिजेक्ट केल्यास ते तीन महिन्यांपर्यंत ते अपलोड होत नसल्याने लाभार्थ्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे.

घरकुल बांधकामासाठी कर्ज काढल्याशिवाय पर्याय नसतो. त्यासाठी बचत गट, पतसंस्था, फायनान्स आदीं ठिकाणी त्यांना उंबरठे झिजवावे लागतात. २०२४-२५ या वर्षात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गावागावात शेकडो लाभार्थ्यांना घरकुलासाठी मंजुरी देण्यात आली आहे. पण घराच्या साहित्याच्या महागाईमुळे घरकुलधारकांना आनंदापेक्षा चिंतेचे सावट त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.

मागील साधारणतः दोन ते तीन महिन्यांपासून फोटो काढण्यासाठी अधिकाऱ्यांची विनवणी करीत आहे. मात्र टाळाटाळ केली जात आहे. स्पॉट फोटो काढून ते केव्हा अपलोड करणार व केव्हा लाभार्थ्यांचे मस्टर पेमेंट निघणार हा प्रश्न गंभीर बनला आहे. घरकुल बनविण्यासाठी साहित्याच्या किमती वाढल्या असताना तुटपुंज्या अनुदानावर समाधान मानावे लागत आहे.
-सुरेश शेळके लाभार्थी, फत्तेपूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT