Fruit Orchards Span 38,000 Hectares; Sweet Lime Takes the Lead in the District
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात फळबाग लागवडीचा झपाट्याने विस्तार होत असून एकूण सुमारे ३८ हजार ७४० हेक्टर क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. या क्षेत्रातून सुमारे ४.७४ लाख मेट्रिक टन उत्पादन घेतले जात असून जिल्हा फलोत्पादनाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार आंबड, घनसावंगी, जालना आणि परतूर हे तालुके फळबाग लागवडीत आघाडीवर आहेत. विशेषतः मोसंबी हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिक ठरले असून तब्बल २९ हजार ५४५ हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड आहे. या पिकातून सुमारे ३.५४ लाख मेट्रिक टन उत्पादन घेतले जात आहे.
त्याखालोखाल डाळिंब पिकाचा क्रमांक लागतो. जिल्ह्यात २ हजार ५७७ हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड होऊन सुमारे ४१ हजार मेट्रिक टन उत्पादन मिळत आहे. याशिवाय लिंबू, चिकू, केळी, द्राक्ष, पेरू आणि आंबा या फळपिकांचीही मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे. परंपरागत पिकांवर अवलंबून असलेले शेतकरी आता उत्पन्नवाढीच्या दृष्टीने फळबागांकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. हवामानातील बदल, पाण्याचे नियोजन आणि बाजारपेठेतील वाढती मागणी या घटकांमुळे फळबाग शेतीला चालना मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
दरम्यान, शासनाकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान (NHM), महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGA) तसेच राज्य पुरस्कृत फळबाग योजना यांद्वारे अनुदान, सिंचन सुविधा, रोपे आणि तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फळबाग लागवड करणे अधिक सुलभ होत आहे.
योग्य नियोजन, ठिबक सिंचनाचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास जालना जिल्हा फळउत्पादनात राज्यात अग्रस्थानी येऊ शकतो, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
फळबाग आकडेवारी
जिल्ह्यात सुमारे ३८,७४० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड झाली असून एकूण ४.७४ लाख मेट्रिक टन उत्पादन घेतले जाते. मोसंबी हे प्रमुख पिक असून २९,५४५ हेक्टर क्षेत्रावर त्याची लागवड आहे. डाळिंबाचे २,५७७हेक्टर क्षेत्र असून सुमारे ४१ हजार मेट्रिक टन उत्पादन मिळते. आंबड, घनसावंगी, परतूर व जालना हे तालुके आघाडीवर आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे फळबाग शेतीला मोठी चालना मिळत आहे.