Four accused in Londhe murder case arrested
जालना, पुढारी वृत्तसेवा : नूतन वसाहत येथील खून प्रकरणातील ४ आरोपींना कदीम जालना पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेतील दोन आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून तर दोघांना रामनगर व नागेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली होती.
दरम्यान, शनिवारी रात्री १ वाजेच्या सुमारास सुरेश गायकवाड यांच्या घराजवळ नूतन वसाहत येथे जुन्या वादाच्या कारणावरून विकास प्रकाश लोंढे (वय २४) रा. नूतन वसाहत, जुना जालना) याच्यावर जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती. गंभीर जखमी विकासला सुरुवातीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मयताचे वडील प्रकाश गंगाधर लोंढे यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी फरार झाले होते. त्यामुळे त्यांच्या शोधासाठी कदीम जालना पोलिसांनी तीन तपास पथके स्थापन केली. गुप्त बातमीदार, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना अटक केली.
या हल्ल्यातील दोन आरोपी सोनू संतोष जाधव, सोनू ऊर्फ नागेश हरिश्चंद्र गायकवाड, रा. नूतन वसाहत, जुना जालना या दोघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. तर चंद्रकांत गंगाधर जाधव, रा. नूतन वसाहत, जुना जालना याला रामनगर तर सुमित संजय जाधव, रा. नुतन वसाहत, जुना जालना याला नागेवाडी, चंदनझिरा येथून अटक केली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आरोपींच्या शोधासाठी तीन पथके
टोळक्याच्या मारहाणातील गंभीर जखमी झालेल्या विकास लोंढे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे नूतन वसाहत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आरोपींच्या शोधासाठी कदीम जालना पोलिसांनी तीन पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथून तर दोघांना रामनगर व नागेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.