घनसावंगी ः नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात घनसावंगी तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांचा ज्वलंत प्रश्न विधानसभेत ऐरणीवर आला. आमदार डॉ. हिकमत उढाण यांनी अतिवृष्टी व जायकवाडी धरणातून झालेल्या अवाजवी विसर्गामुळे गोदावरी नदीकाठच्या तब्बल 40 गावांवर आलेल्या पुरस्थितीची सविस्तर माहिती सभागृहासमोर मांडली. या पुरामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात आर्थिक व सामाजिक नुकसान सहन करावे लागले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार डॉ. उढाण यांनी सांगितले की, गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये अचानक आलेल्या पूरपाण्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पूर्णपणे नष्ट झाली. अनेक शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यासोबतच शेकडो घरे पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. सार्वजनिक व खासगी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अद्यापही या गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
पूरग्रस्त गावांसाठी पूररेषा निश्चित करणे अत्यंत आवश्यक असून, वर्षानुवर्षे हा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये कायमस्वरूपी असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे तातडीने पूररेषा निश्चित करून दीर्घकालीन नियोजन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी आमदार डॉ. उढाण यांनी केली.
अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक रस्ते, पूल, पाझर तलाव व इतर पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण पूर्णतः विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. या सर्व कामांच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर करून तातडीने कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही त्यांनी सभागृहात केली.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध शासकीय अनुदान योजनांमध्ये ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे मोठे अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे पात्र असूनही अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करून अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
दिलासा मिळण्याची आशा
या सर्व मुद्द्यांवर मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेत, अधिवेशन समाप्तीनंतर संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन घनसावंगी तालुक्यातील सर्व समस्यांवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली असून, घनसावंगी तालुक्यातील प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे मांडल्याबद्दल आमदार डॉ. हिकमत उढाण यांचे कौतुक होत आहे.