Fish death in Jangi pond at Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा :
अंबड येथील जंगी तलावातील शेकडो माशांचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळेस एवढ्या मोठ्या संख्येने माशांचा मृत्यू झाल्याने तलाव परिसरात मृत माशांचा खच पडल्याचे पहावयास मिळाले. दुषीत पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
शहरातील श्री मत्स्योदरी देवी मंदिर-ाजवळील पाच पिंपळचा जंगी तलाव मे महिन्यात पडलेल्या अवकाळी बेमोसमी पावसामुळे तुडुंब भरला आहे. या जंगी तलावात टाकलेल्या मत्स्यबीजामुळे मत्स्यव्यवसाय होणार होता. मात्र ६ रोजी तलावातील ७ ते ८ टन मासे अचानक मृत पावल्याने ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलावाचे ठेकेदार व तलाव रक्षक असद पठाण यांनी सांगितले.
अंबड शहरातील या जंगी तलावाच्या काठावर मृत माशांचा ढीग पडल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. माशांच्या मृत्यूचे खरे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. माशांच्या मृत्यूमागे दूषित पाण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मागील वर्षी देखील अशाच प्रकारे माशांचा तडफडून मृत्यू झाला होता. तलावाचा ठेका दोन वर्षासाठी एम. पी. इंटर इंटरप्राईजेसला देण्याता आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.