जालना : शहरात सोमवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसाने महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व कामांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अवघ्या काही वेळ झालेल्या पावसात मध्यवर्ती बसस्थानक, संग्रामनगर, गांधीनगर, टट्टूपुरा, चंदनझिरा आणि सुंदरनगर परिसरात नाल्यांचे घाण व दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
महिनाभरापूर्वी खोदून ठेवलेल्या नाल्यांमध्ये पाणी तुंबल्याने बसस्थानक परिसरात तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली. कोलू तेल घाना ते बसस्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागले. काही भागांत घाण पाणी घरांमध्ये शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
मान्सूनपूर्व नालेसफाई व पाणी निचरा व्यवस्थेबाबत वारंवार सूचना करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला. ‘पहिल्याच पावसात शहर जलमय, मग मान्सूनपूर्व कामे झाली कुठे?” असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे.