Fire at Municipal Council's solid waste project
अंबड, पुढारी वृत्तसेवा : अंबड नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पातील डम्पिंग कचऱ्याला शनिवारी (दि.२३) दुपारी अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. दुपारी २.३० ते ३ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे प्रकल्पालगत असलेल्या भिल्ल समाजाच्या वस्तीसमोर मोठे संकट निर्माण झाले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
ड्युटीवर असलेले कर्मचारी दामोदर तुपे व कारके यांनी आग लागताच तातडीने मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर अंबड नगरपरिषदेसह घनसावंगी व बदनापूर नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा स्वच्छता सभापती सचिन खरात यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
घनकचरा प्रकल्पाच्या वॉल कंपाऊंडलगत भिल्ल समाजाची सुमारे ६० ते ७० गवती छप्पर, ताडपत्री व पत्र्याची घरे आहेत. या वस्तीतील बहुतांश कुटुंबे ऊसतोड व मजुरी करून उदरनिर्वाह करतात. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी ठेव लेले कडब्याचे ढिगही परिसरात होते. महिला व नागरिक पाण्याची भांडी घेऊन आग विझविण्यासाठी धावपळ करू लागले.
अंबड नगरपरिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल्याने वस्तीतील घरे, कडवा तसेच नागरिकांचे जीव वाचले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रविवारी (दि.२४) सकाळपासून अग्निशमन दलाचे कर्मचारी स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांच्य मार्गदर्शनाखाली सय्यद अफसर भा व त्यांच्या पथकासह आ विझविण्याचे काम करीत होते.
अनेक वर्षांपासून आम्ही या शासकीय जागेजवळ गवती छप्पर, पत्र्याचे शेड व ताडपत्रीची घरे बांधून राहत आहोत. घनकचरा प्रकल्पामुळे दररोज दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. मात्र, दरवर्षी या डम्पिंगला आग लागल्याने आमच्या जीवितालाच धोका निर्माण होत आहे. नगरपरिषद प्रशासनाने आमच्या वस्तीलगतची संरक्षण भिंत किमान बारा फूट उंच करावी.- भरत मोरे