जालना : नानाजी देशमुख कृषी संजीवनी अर्थात (पोकरा) योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यात झालेल्या कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी गुरुवार, दि. 12 रोजी दोन लेखाधिकाऱ्यांविरुद्ध सदर बाजार पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घोटाळ्यातील सुत्रधारावर देखील कारवाईची टांगती तलवार आहे.
दरम्यान, या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याबाबत पोलिसांकडून टाळाटाळ केली जात होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी पाठपुरावा केला. पोकरा योजनेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते सुरेश गवळी यांनी थेट राज्यपालांकडे केलेली आहे.
विशेष म्हणजे, यासंदर्भात कृषी विभागाकडून स्पष्ट आदेश होऊनही दीड महिना उलटून गेला तरी गुन्हा दाखल केला जात नव्हता. यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. कृषी विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी 5 डिसेंबर रोजी आयुक्तांना पत्राद्वारे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जालना येथील उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाने सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मात्र, दीड महिना उलटूनही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याने दोषींना वाचवण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान, या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात देखील गुन्हे दाखल करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.
असे असतानाही मुख्य दोषींवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत, फक्त दोन लेखाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पत्र देण्यात आले असून, त्यावरही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, याकडे गवळी यांनी लक्ष वेधले आहे. शासनाने घोटाळेबाजांकडून वसुली करावी, अशी मागणी गवळी यांनी दिली.
चौकशीत सहा अधिकारी दोषी; अडीच कोटींची वसुली प्रस्तावित
पोकरा योजनेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी कृषी विभागाने विविध पथकांमार्फत चौकशी केली असता तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण, रामेश्वर भुते, व्यंकट ठक्के तसेच लेखाधिकारी सुभाष यशवंते, आकाश टाक व महेंद्र आचारे या सहा अधिकाऱ्यांवर दोष सिद्ध झाल्याचे समोर आले आहे. या सर्वांकडून 2 कोटी 51 लाख 46 हजार 634 रुपयांची रक्कम वसूल करणे प्रस्तावित असून, त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याची माहिती सुरेश गवळी यांनी दिली.
विविध कलमानुसार गुन्हा - पोकरा योजनेतील अनुदान वाटपातील गैरव्यवहारबाबत दोन लेखाधिकारी यांच्यावर 408, 9, 420, 34 नुसार शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 64 लाखांचे अनुदान चुकीच्या पद्धतीने वितरित केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.आनंदसिंग साबळे, सपोनि. सदर बाजार पोलिस ठाणे.