जालना : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या आणि अनुदानित खतांचा काळा बाजार करणाऱ्यांविरोधात कृषी विभागाने जिल्ह्यात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. आतापर्यंतच्या धडक मोहिमेत जिल्ह्यातील 3 कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून, 21 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे साठेबाजांचे धाबे दणाणले असून खत विक्रीतील मोठा गैरप्रकार समोर येण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने एप्रिल महिन्यापासून 20 पेक्षा अधिक युरिया बॅगची उचल करणाऱ्या 504 संशयास्पद शेतकऱ्यांची यादी तयार केली होती. त्यापैकी 391 शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
तब्बल 128 प्रकरणांमध्ये शेतकऱ्याचे क्षेत्रफळ, पीक पद्धती आणि त्याने खरेदी केलेले खत यांचा ताळमेळ बसत नसल्याचे दिसून आले. यामध्ये दुसऱ्याच्या शेतकरी ओळखपत्राचा (फार्मर आयडी ) गैरवापर करून खते लाटल्याचा संशय बळावला आहे.
केवळ शेतकरीच नव्हे, तर कृषी केंद्रांचीही कसून तपासणी सुरू आहे. जिल्ह्यातील 225 केंद्रांची झाडाझडती घेण्यात आली असून, यात अनियमितता आढळलेल्या 62 विक्रेत्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गंभीर त्रुटी आढळल्याने 24 विक्रेत्यांवर (21 निलंबित, 3 रद्द) थेट कारवाई करण्यात आली आहे. तपासणी मोहिम अजून तीव्र केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
एकूण तपासणी : 225 कृषी केंद्रे.
परवाने रद्द : 3 केंद्रे.
परवाने निलंबित : 21 केंद्रे.
नोटीस बजावली : 62 विक्रेते.
संशयास्पद शेतकरी : 128
(खत उचल आणि वापरामध्ये मोठी तफावत).
अनुदानित खतांचा अपहार करून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी ही मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाईल.पी. बी. बनसावडे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद जालना