Manoj Jarange : 28 मेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण  file photo
जालना

Manoj Jarange Patil : 28 मेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

आ. प्रसाद लाड यांच्याशी अंतरवाली सराटीत चर्चा

पुढारी वृत्तसेवा

Fasting if demands are not met by May 28: Jarange

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा :

उपोषण थांबवायचे असेल तर सरकारने २८ मे पर्यंत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सरकारकडून मागण्या पूर्ण न झाल्यास अंतरवालीत ३० मे रोजी उपोषणास प्रारंभ करणार असल्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी (दि.२२) अंतरवाली सराटी येथे आ. प्रसाद लाड यांच्यासोबत झालेल्या भेटीत दिला. तसेच या मागण्यांबाबत सरकारला चर्चेसाठी आपली दारे खुली असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

भाजपा नेते आ. प्रसाद लाड यांनी जरांगे यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान जरांगे आणि आ. लाड यांच्यात मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जरांगे यांनी मी कुणाचेही ऐकून आंदोलन करत नाही. समाजासाठी आंदोलन करतो. आमच्या नोंदी आहेत. सरकारने जीआर काढूनही आमचं आरक्षण दिलं नाही. शिंदे समितीच्या ५८ लाख नोंदींचं काय झाले ? ज्या कुणबी नोंदी सापडल्या त्या जाहीर करा. नोंदी सापडूनही आरक्षण दिले जात नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षण द्यावे, सहा कोटी मराठे त्यांच्यावर फुल उधळतील. असे सांगितले.

८० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली. महामंडळाचे परतावे दिलेले नाहीत. या संदर्भात तुम्ही मंत्री विखेंना फोन लावून सांगा. मागील काही दिवसांत आम्ही काय सांगितले. महामंडळाचे परतावे नाहीत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. हैदराबाद गॅझेटीयर नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप का केले नाही. फडणवीस यांच्या कार्यालयाकडून फोन आल्याने कुणबी प्रमाणपत्र वाटप बंद केल्याचे अधिकारी सांगतात. असा आरोप त्यांनी केला.

जरांगे म्हणाले की, आ. प्रसाद लाड यांनी मध्यस्थी करत काही शब्द दिले आहेत. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही गावागावांत सुरू असलेल्या मराठा समाजाच्या बैठका सध्या थांबवल्या आहेत. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण शंभर टक्के होणार आहे. मी एकाटाच उपोषण बसणार असून त्याची रणनीती २८ तारखेला सकाळी १० वाजता जाहीर करणार असल्याचे सांगितले.

... तर आमदारकीचा राजीनामा : आ. लाड

मनोज जरांगे यांच्या मागण्यांबाबत २८ तारखेच्या आत मागण्या मान्य झाल्या नाही, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन ! असे आ. प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितले. आ. लाड म्हणाले की, जरांगे यांनी केलेल्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. काही गैरसमजातून विषय निर्माण झाले आहेत, पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजून घेतले पाहिजे, अशी विनंती त्यांना केली आहे. ३० मे ही आंदोलनाची तारीख योग्य नाही. सध्या कडक ऊन आहे आणि शेतकऱ्यांचे पेरणीचे दिवस आहेत. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT