

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्याची फुस शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी लावली असल्याचा आरोप होत आहे. त्यावर उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं. त्यांनी आपल्यावरचे आरोप खोडून काढत मनोज जरांगे पाटील एवढे छोटे नेतृत्व नाही असं सांगितलं.
'प्रसाद लाड आता माझ्या भूमिकेत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार म्हणून आरक्षण योग्य निर्णय घेतले. काही त्रुटी राहिल्या असतील किंवा अन्याय होत आहे, असे जरांगे यांना वाटत असेल तर विखे समिती अध्यक्ष आहेत. मराठा समाजावर अन्याय होणार नाही, अशी सरकारची भूमिका आहे. सातारा गॅझेट त्यांची मागणी आहे, हा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, न्याय देण्याची भूमिका सरकार घेत आहे.' उद्योगमंत्री, शिवसेना नेते उदय सामंत पत्रकार परिषदेत बोलत होते.
जरांगे भेट, आंदोलनाबाबत ते म्हणाले, मला भेटल्यावर जरांगे यांचे आंदोलन सुरू झाले असते. तर संभाजीनगरच्या पत्रकारांना याचा अनुभव आला असता, मी लपून छपून भेटलो नाही. माझे व्हिडिओ आहेत. मी सांगून त्यांनी आंदोलन करणे एवढे छोटे नेतृत्व जरांगे यांचे नाही. गुणरत्न सदावर्ते सांगत आहेत म्हणून ही ब्रेकींग झाली. भाजप नेते बोलले असले तर चालले असते, वकील साहेब सर्वांचे मनोरंजन करतात, अशी कोपरखळी देखील सामंत यांनी मारली.
शिवसेना नेते उदय सामंत यांनी एप्रिलमध्ये अंतरवाली सराटीत जाऊन जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर दोन आठवड्यातच जरांगे पाटील यांनी अंतरवालीत उपोषणाची घोषणा केली आहे. आता सामंत आणि जरांगेंच्या या भेटीचे कनेक्शन आंदोलनाशी जोडले जात असल्याने त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नेत्यांची भेटीबाबत ते म्हणाले-लाड यांना शासनाने पाठवले आहे. ते चर्चा करतील. काही विरोधात बोलले तर फोन करून शिविगाळ करणे हा ट्रेंड झाला आहे. याबाबत पोलिसांनी योग्य कारवाई करावी.
सामंत पुढे म्हणाले, या सरकारने मराठा समाजाला सर्व काही दिलं आहे. आम्ही १० टक्के आरक्षण दिले आहे. मला मुख्यमंत्री आणि शिंदे साहेब यांनी सांगितले तर मी नक्की जरांगे यांना भेटण्यासाठी जाईन.
हसन मुश्रीफ आरोपाबाबत ते म्हणाले- मी एखादी भूमिका व्यक्तीगत मांडतो. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे. पक्ष सांगतो ती भूमिका आम्ही मांडतो. त्यांचा पक्ष कसा वाढवावा हा त्यांचा प्रश्न आहे. शिरसाट यांचे मत वैयक्तिक मत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेबाबत ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. भाजपकडून बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण तर शिवसेनेकडून मी आणि दादा भुसे उपस्थित होतो. आम्ही सर्वांनी मिळून सर्वसामावेशक असा प्रस्ताव तयार केला आहे. याच प्रस्तावावर आमचे तीन मोठे नेते बसतील आणि अंतिम निर्णय घेतील. इंधनाबाबत ते म्हणाले-सर्वांनी देशाच्या सोबत उभे राहिले पाहिजे. देशाच्या एखाद्या नेत्यांनी ही कृती टंचाई केली नाही. युद्धामुळे काही परिस्थिती निर्माण होत आहे.
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जीआर जो काढला त्याची अंमलबजावणी खूप संथ गतीने सुरू असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जात नाहीये, ज्यांना दिले त्याला वैधता दिली जात नाहीये, असे आरोप जरांगे पाटील यांनी केले आहे. पुन्हा नव्याने ३० मे पासून आंदोलनाचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.