Farmers' Uprising Against Digital Meters
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली व परिसरातील शेतकऱ्यांनी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, वाढीव वीजबिले, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय बसविण्यात येणारे डिजिटल मीटर तसेच सुरू असलेल्या वीजपुरवठ्यातही करण्यात येणाऱ्या भारनियमनाच्या निषेधार्थ घनसावंगी येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. लेखी आश्वासानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व धर्मवीर सामाजिक क्रांतीचे अध्यक्ष रामभाऊ घोगरे यांनी केले. खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकरी शेतीच्या विविध कामांमध्ये व्यस्त आहेत. पिकांसाठी पाणीपुरवठा, मशागतीची कामे व इतर शेती व्यवस्थापनासाठी अखंडित वीज आवश्यक असताना वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा तासन्तास वीजपुरवठा खंडित राहत असल्याने शेतीपंप बंद पडतात आणि शेतीची कामे खोळंबतात, अशी भावना आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी रामभाऊ घोगरे म्हणाले की, शेतकरी उन्हातान्हात राबून अन्नधान्य उत्पादन करतो. मात्र त्याला आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाच मिळत नसल्याने तो अडचणीत सापडला आहे. वारंवार वीज खंडित होणे, वाढीव वीजबिले आणि डिजिटल मीटरचा वाढता प्रश्न यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
प्रशासनाने या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांचा संताप अधिक तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून निवेदन स्वीकारले. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तथापि, दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्यास आणि वीजपुरवठ्याच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला.
या आहेत मागण्या
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, वाढीव वीजबिलांचा फेरविचार करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांच्या मागणीशिवाय व संमतीशिवाय डिजिटल मीटर बसविण्याची प्रक्रिया थांबवावी, शेतीपंपांना नियमित व पुरेसा वीजपुरवठा करावा तसेच अनावश्यक भारनियमन बंद करावे, अशा प्रमुख मागण्या केल्या.