Farmers turn to drip irrigation as rains delay
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात जुन महिना अर्था उलटुनही तालुक्यात समाधानकारक पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. मान्सून स्थिरावण्यास विलंब होत असल्याने - खरीप हंगामाच्या कामांवर परिणाम झाला आहे. शेतकरी. पावसाच्या प्रतीक्षेत असतांनाच अल निनोमुळे पावसाच्याच आगमनाबाबत येणारे विविध अंदाज शेतकर्यांची काळजी वाढविणारे आहेत. विहीरींनी तळ गाठल्याबने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर पिके वाचविण्यासाठी धडपड सुरु केली आहे.
घनसावंगी तालुक्यात यंदा मान्सूनच्या आगमनानंतर काही ठिकाणी किरकोळ सरी कोसळल्या. मात्र व्यापक पेरणीसाठी आवश्यक असलेला ओलावा जमिनीत निर्माण झालेला नाही. परिणामी अनेक शेतकरी पेरणीपासून दूर आहेत. खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या नियोजनावर पाणी फिरले आहे. शेतीच्या कामांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे.
सध्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी विहीर, बोअरवेल आणि शेततळ्यातील उपलब्ध पाण्याच्या आधारे कपाशीची लागवड करत आहेत. विशेषतः ठिबक सिंचन व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीची कामे मोठ्या प्रमाणात पूर्ण केली आहे. पावसाची वाट पाहत बसल्यास लागवड उशिरा होऊन उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, या भीतीने अनेकांनी हा पर्याय स्वीकारला आहे.
दरम्यान, कपाशीबरोबरच सोयाबीन, तूर, मूग, यांसारख्या इतर खरीप पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात रखडल्या आहेत. अनेक शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाकडून पावसासाठी पोषक वातावरण असल्याचे संकेत तालुक्यातील काही भागांत कपाशीची उगवणही सुरू झाली असून शेतांमध्ये हिरवळ दिसू लागली आहे. मात्र या पिकांच्या पुढील वाढीसाठी नियमित पावसाची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
जून महिना अर्धा उलटुनही पाऊस पडला नसल्यााने ठिबक सिंचनाव्दारे कपाशी लागवड केली. सध्या उगवण चांगली आहे. आता येत्याब काही दिवसात चांगला पाऊस पडला तर पिकांना फायदा होईल, अन्यथा पुढे पाण्याचे नियोजन करणे कठीण होईल. पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादन चांगले मिळण्यासाठी आता नियमित व समाधानकारक पावसाची गरज आहे.- भरत भोरे, शेतकरी, म. चिंचोली
पाण्यासाठी ठिबक सिंचनावर खर्च
ठिबक सिंचनामुळे कमी पाण्यात अधिक क्षेत्राला ओलावा देता येतो. तसेच पिकांच्या मुळांपर्यंत थेट पाणी पोहोचत असल्याने पाण्याचा अपव्यय टळतो. खत व्यवस्थापनही अधिक प्रभावीपणे करता येत असल्याने सुरुवातीच्या टप्प्यात कपाशीची वाढ चांगली होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे यंदा पावसाअभावी ठिबक सिंचन शेतकऱ्यांसाठी आधार ठरत असल्याचे चित्र आहे.