Farmers struggle to save crops; wait for rain continues.
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने घनसावंगी तालुक्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. पेरणीनंतर सुरुवातीला पडलेल्या पावसामुळे सोयाबीन, कापूस व अन्य खरीप पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने जमिनीतील ओलावा कमी होत चालला आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना विहिरीतील जेमतेम पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. तुषार सिंचनाद्वारे सोयाबीन व कापूस पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
तालुक्यातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतशिवारातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पिकांची वाढ सुरू असली तरी पावसाअभावी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. सोयाबीन पिकाला वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असताना कापूस पिकालाही पाण्याची गरज भासत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्यातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.
पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीतही अपेक्षित वाढ झालेली नाही. अनेक विहिरींमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक असून, त्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी तुषार सिंचनाचा आधार घेतला जात आहे. तुषार संचाच्या माध्यमातून कमी पाण्यात पिकांना ओलावा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विहिरीतच पुरेसे पाणी नसल्याने हे पाणी आणखी किती दिवस पुरणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
गेल्या काही दिवसांपासून आकाशात गर्दी करणारे ढग न पडताच निघुन जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असला तरी तो पिकांसाठी पुरेसा ठरलेला नाही. जमिनीला भिजवून पिकांना नवसंजीवनी देणाऱ्या दमदार पावसाची आता नितांत गरज आहे.
पावसाअभावी उत्पादन घटण्याची भीती
पावसाने आणखी दडी मारल्यास सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असून कापूस पिकालाही त्याचा फटका बसू शकतो. आधीच पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकरी चिंतेत असताना विहिरीतील पाणीसाठाही कमी होत असल्याने संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे विहिरीतील शेवटच्या पाण्याच्या आधारावर पिके जगविणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत.