पोकलेन मशीनद्वारे विहीर खोदणीला शेतकऱ्यांची पसंती pudhari photo
जालना

Poklen Well Digging : पोकलेन मशीनद्वारे विहीर खोदणीला शेतकऱ्यांची पसंती

शेती रिकामी झाल्याने विहिरींच्या खोदकामांना सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

वालसावंगी ः भोकरदन तालुक्यातील वालसावंगीसह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये पोकलेन मशीनद्वारे विहीर खोदण्याची पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे. मजुरांची कमी उपलब्धता आणि पारंपारिक पद्धतीने विहीर खोदायला लागणारा जास्त वेळ लक्षात घेता, पोकलेन मशीनचा वापर हा शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर आणि जलद ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीला वेळेत पाणीपुरवठा करण्याची मोठी सोय होत आहे. सध्या शेतजमीन खाली झालेल्या असून तालुक्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी विहिरींचे खोदकाम सुरू केल्याचे दिसून येत आहे.

शेतीला पुरेसा पाण्याचा पुरवठा मिळवण्यासाठी अनेक शेतकरी विविध पद्धती अवलंबत आहेत. काही शेतकरी नदीवरून पाईप लाईन करतात, तर काही कूपनलिका आणि विहीर खोदून पाण्याचा स्रोत निर्माण करतात.

विशेषतः वालसावंगी परिसरात अनेक गावांतील शेतकरी मिर्ची आणि फूल शेती, अद्रक याचे मोठे उत्पादन घेतात. मिर्ची च्या पिकाला भरपूर पाण्याची गरज असल्याने, शेतकरी पाण्याचे स्रोत तयार करण्यावर भर देत आहेत. दरम्यान, मजुरांकडून विहीर खोदण्याची पारंपारिक पद्धत वेळखाऊ आणि श्रमकष्टाची असते.

साधारणतः एका विहिरीची खोदाई तीन महिने चालते. मात्र, पोकलेन मशीनच्या वापरामुळे हीच विहीर केवळ 8-10 दिवसांत खोदली जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळात आणि अधिक कार्यक्षमतेने विहीर उपलब्ध होते. याशिवाय, विहीर खोदाईची संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित असल्याने मजुरांवर अवलंबून राहण्याची गरज राहत नाही. त्यामुळे शेतकरी पोकलेन मशीनद्वारे झटपट विहिरींचे काम पूर्ण करत आहे.

मशीनद्वारे 75 फूट खोदकाम- मोठ्या एलआर पोकलेन मशीनद्वारे साधारणतः 10 परस क्षेत्रातील आणि 75 फूट खोल विहीर खोदायला आता केवळ 8-10 दिवस लागतात. ही मशीन माती, मुरूम आणि खडक सहजतेने बाहेर काढते. यामुळे श्रम वाचतात. मशीन खडकाळ क्षेत्रात खडक उचलण्याचे कामही सुलभपणे करते, ज्यामुळे खोदाईची प्रक्रिया अधिक गतिमान होते.
दिनेश वखरे, शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT