डोणगाव, पुढारी भोकरदन : यंदा पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे खराब झाला असून, उर्वरित मक्याचा उत्पादन काढणीसाठी शेतकरी मक्याची कापणी करून मळणी यंत्रांद्वारे खासगी व्यापाऱ्यांना विक्री करत आहेत मात्र, या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची मोठी लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार राजूर येथील केंद्रावरच नव्हेतर जिल्हाभरातील खासगी केंद्रांवर सुरू असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
मक्याच्या प्रत्येक ५५ ते ६५ किलोच्या कट्ट्यामागे ८०० ते ८५० ग्रॅम म्हणजेच एका क्लिंटलमागे १६०० ग्रॅम मका शिल्लक घेतली जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. ही शिल्लक म्हणजे रिकाम्या पोत्याचे वजन असल्याचे संबंधित केंद्रचालकाकडून सांगितले जाते.
प्रत्यक्षात, पोत्याचे वजन ६०० ग्रॅम एवढेच असते. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा होत आहे. शिवाय, जर शेतकऱ्याने कॅशमध्ये पैसे घेतले, तर २ रुपये टक्क्यांने अतिरिक्त कपात केली जाते. तसेच, शेतकऱ्यांना सेम तारखेचा धनादेश न देता पुढील दहा दिवसांची तारीख टाकून दिला जातो. त्यामुळे शेतकरी कॅशमध्येच व्यवहार करीत आहेत.
यामध्ये हमालीचाही खर्च वजा केला जातो. त्याचप्रमाणे, कडता म्हणून प्रत्येक क्विंटलमागे दोन किलो मका व्यापाऱ्याकडून शिल्लक घेतली जाते. शेतकऱ्यांना दर्जानुसार मक्यासाठी १२०० ते १७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तरीही व्यापारी अनेक कारणे सांगून वेगवेगळ्या पद्धतीने मका कपात करीत आहेत. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. एवढेच नव्हेतर या केंद्रावर शेतकऱ्यांना बाजार समितीच्या नियमानुसार मूळ (ओरिजनल) बिलाची पावती दिली जात नाही.
शेतकऱ्यांकडून दोनवेळा घेतात हमाली
शेतकऱ्यांना गाडीभाडे म्हणूनही प्रत्येक क्लिंटलसाठी ६० रुपये आकारले जात आहेत. तर अंतरानुसार हा खर्च अधिक वाढतो. तो शेतकऱ्यांनाच गाडीमालकांना द्यावा लागतो. जालना येथे माल नेल्यास अतिरिक्त रक्कम भरावी लागते.
यात गाडीचालकही शेतकऱ्यांकडून शेतातून माल घेऊन आल्यानंतर भाड्यासह हमाली घेतात. त्यानंतर व्यापारीदेखील गाडीतून माल बाहेर काढून घेण्यासाठी पुन्हा हमाली घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मालाची विक्री होईपर्यंत दोनवेळा हमाली द्यावी लागते.
प्रशासनासह समितीने लक्ष देण्याची मागणी
यंदा पावसामुळे खरीप हंगाम खराब झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यात व्यापाऱ्यांकडूनही मोठी फसवणूक केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळत आहे. याकडे प्रशासन व बाजार समितीने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
एका पोत्याचे वजन
नियमानुसार ६०० ग्रॅम कपात करायला हवे. ज्या दिवशी माल विक्री केला आहे. त्याच तारखेचा त्यांना धनादेश द्यायला हवा. कुठल्याही व्यापाऱ्याला कडता म्हणून एका क्विंटलमागे दोन किलो मका शिल्लक घेता येत नाही. ही दोन किलो मका शिल्लक घेणे म्हणजे नियमबाह्य आहे. तसेच, माल विक्री केल्यानंतर शेतकऱ्यांना नियमानुसार मूळ पावती द्यावी. जे व्यापारी देणार नाहीत. कारवाई केली जाईल. -संतोष ढाले, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भोकरदन