Farmers' inclination towards sugarcane cultivation
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : ऊस उत्पादक, म्हणून ओळख असलेल्या अंबड घनसावंगी तालुक्यात ऊस लागवडीत शेतकऱ्यांनी बदल करून रोपलागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. ऊस लागवडी पारंपरिक कांडीऐवजी रोपांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढत आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे कंबरडे मोडले ! खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे कठीण झाले आहे. पैठण नाथसागर धरण भरल्याने डाव्या कालव्याला सिंचनासाठी पाणी सोडले त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीचे पीक सततच्या पावसामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात ऊस लागवडीकडे वळले आहेत.
शेतकरी उस लागवड करताना उसाचे टिपरं तोडुन दोन डोळे, तीन डोळे अशा पद्धतीने केली जात होती अजुनही सुरूच आहे. या पद्धतीची लागवड करताना शेतकरी एका एकरातून अधिकाधिक ऊस मिळावा म्हणून दोन टिपऱ्यांत एक फुट अंतराची शिफारस प्रत्यक्षात समोरासमोर म्हणजे टक्कर पद्धतीने उस असताना जमिनीत लागवड करतो.
त्यातून टिपरातुन म्हणजे उस अधिक लागतो त्यातून खर्चही वाढतो. आताच्या ऊसाला मिळणारा भाव पाहता, लागवडीसाठी प्रति एकरी तीन ते चार टन बियाणे वापरणे ही परवडणारी बाब नाही. त्याचप्रमाणे लागवड करणाऱ्याचाही खर्च विनाकारण वाढणारा आहे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक उस लागवडीत बदल म्हणून उत्पादनवाढीसाठी, रोगमुक्त ऊस आणि १०० टक्के उगवण या त्रिसूत्रीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर रोपलागवडीला प्राधान्य देऊ लागले आहेत. परिणामी ऊस रोपवाटिकांमध्ये विविध वाणांच्या रोपांना मोठी मागणी वाढली असून, अनेक ठिकाणी रोपांची टंचाई जाणवू लागली आहे.
परंपरागत कांडी लागवडीत उगवण कमी होते. याउलट रोपलागवडीत उगवण अधिक, वाढ एकसमान आणि वाढीचा कालावधी तुलनेने कमी असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. या पद्धतीमुळे आंतरपीक घेणे शक्य होते, तसेच उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ होत असल्याचे प्रगतशील शेतकरी सांगतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कांडीऐवजी तयार रोपांच्या माध्यमातून लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत.
मागणीनुसार रोपांची लागवड
काही शेतकरी स्वतःच्या शेतातच रोपे तयार करण्याकडेही वळले आहेत. ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असून, वाढत्या मागणीनुसार रोपांचा वेळेत पुरवठा करणे हे रोपवाटिकांसमोर सध्या मोठे आव्हान ठरत आहे.
ऊस कांडीपासून लागण केल्यास १०० टक्के उगवण होत नाही. तसेच वेळेत दर्जेदार ऊस कांडी बियाणे मिळत नाही, रोपांपासून हमखास उगवण चांगली होऊन उत्पादन अधिक मिळते. म्हणून ऊस लागणीसाठी रोपांना लागण करत असतो.
ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल
ऊस पीक अतिपावसातही तग धरून राहते, तसेच त्याला हमीचे उत्पन्न मिळते. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असल्याने, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आता ऊस पिकाकडे मोर्चा वळवला आहे. यंदा तालुक्यात ऊसाची विक्रमी लागवड होण्याचा अंदाज आहे. शेतकरी सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड करून जास्तीचे उत्पादन निघणाऱ्या ऊसाच्या जातींना प्राधान्य देत आहेत.