Farmers in Ghansawangi face a crisis due to drought
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : सोन्यासारखा दसरा सण यंदा दुष्काळाच्या सावटात होऊन गेला. माय-बाप शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून पिकांची पेरणी केली. उन्हातान्हात कष्ट घेत पिके उभी केली; मात्र पावसाने दांडी मारल्याने हातातोंडाशी आलेला घास न हिरावला जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
रानात उभी असलेली पिके पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी येत असून, कष्टाने उभ्या केलेल्या पिकांना जड अंतःकरणाने आलिंगन द्यावेसे वाटत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला पावसाच्या आशेवर शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पेरणी केली. पेरणीनंतर काही काळ पावसाने साथ दिल्याने पिके जोमाने वाढली. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवली. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत गेला आणि जमिनीतील ओलावा कमी होत गेला. परिणामी अनेक भागांत पिकांची वाढ खुंटली असून उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी उभे पीक म्हणजे केवळ शेतातील हिरवळ नाही, तर संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आशा असते. याच पिकातून मुलांचे शिक्षण, घरखर्च, कर्जाची परतफेड, जनावरांचा चारा आणि पुढील हंगामाची तयारी केली जाते. त्यामुळे पिके संकटात सापडली की त्याचा थेट परिणाम संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावर होतो.
दुष्काळी परिस्थितीत सोयाबीन, कापूस, तूर यांसह विविध पिकांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी सोयाबीनची काढणी सुरू झाली असली तरी उत्पादनाऐवजी केवळ मुसा आणि पशुखाद्य मिळत असल्याचे चित्र आहे. वर्षभर कष्ट करूनही हातात उत्पन्न न पडण्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी ठाकली आहे.
रक्ताचे पाणी करून पीक उभे केले. पावसाची वाट पाहत राहिलो; पण पावसाने साथ दिली नाही. आता रानात उभ्या असलेल्या पिकांकडे पाहताना मन भरून येते. हे पीक आमच्यासाठी केवळ पीक नाही, तर आमच्या कष्टाचे आणि जगण्याच्या आशेचे प्रतीक आहे," अशी भावना शेतकरी गणेश पघळ यांनी व्यक्त केली.