Farmers blocked the road against Mahavitaran
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार उघड झाला आहे. निमखेडा येथील शेतातून गेलेल्या विद्युत तारांत शॉर्टसर्किट झाल्या मुळे सुमारे ६० एकरवरील उसाला आग लागली. सुमारे ३ हजार ५०० टन उसाचे क्षेत्र जळून भस्मसात झाले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जाफराबाद शहरात रास्ता रोको आंदोलन केले.
सोमवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. निमखेडा गावात ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असताना वीज वितरण कंपनीचे अधिकारी, महसूलचे अधिकारी स्थळ पाहणीसाठी न आल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निमखेडा बु. येथील शेतकऱ्यांनी जाफराबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे जाफराबाद येथून विदर्भ, खानदेश आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
जाफराबाद तालुक्यातील उसाचे क्षेत्र असलेल्या निमखेडा बु., देऊळझरी, हनुमंतखेडा, ब्रह्मपुरी, कुंभारझरी, आळंद, हिवराकाबली, नळविहिरा यांसारख्या उसाचे क्षेत्र असलेल्या गावातून वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता चेतन मोहेकर यांना शेतामध्ये लोंबकळलेल्या विजेच्या तारा, आणि वाकलेले विजेचे खांब, याविषयी शेतकऱ्यांनी अर्ज देऊन दुरुस्तीची मागणी केली होती.
परंतु याकडे दुर्लक्ष केल्यामुळे निमखेडा शिव- ारात उसाच्या शेतात शार्टसर्किट झाले. जिजाबाई हिवाळे, बाबुराव चव्हाण, शेनफड चव्हाण, उत्तम चव्हाण, गंजीधर चव्हाण, प्रभाकर चव्हाण, विठ्ठल चव्हाण, वाल्मिक हिवाळे, प्रल्हाद हिवाळे, सुभाष चव्हाण, याचे ऊस तर हरिदास वाघमारे यांची कपाशी, तूर जळून भस्मसात झाली. ऐन दिवाळी सणासुदीच्या काळात या शेतकऱ्यांच्या घरी काळा कुट्ट अंधार झाला आहे. आंदोलकांची पोलिस निरीक्षक सतीश जाधव, अभियंता भुसारी, मंडळ अधिकारी काळे यांनी भेट घेतली.
पंचनामा नाही
तालुक्यात इतकी विदारक घटना घडलेली असताना प्रशासकीय यंत्रणा जायमोक्यावर गेली नाही, अथवा स्थळ पहाणी पंचनामा केला नाही. त्यामुळे निमखेडा येथील शेतकरी संतप्त होऊन त्यांनी जाफराबाद येथे रास्ता रोको आंदोलन केले.