Explain the planning of Jayakwadi water for crops
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे आगामी हंगामात ऊसासह रब्बीतील गहू, हरभरा व इतर पिकांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे किंवा नाही, पाणी सोडण्याची संभाव्य तारीख काय असेल आणि आवर्तनाचे नियोजन कसे राहणार, याबाबत जलसंपदा विभागाने अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन रंजित गुजर यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहे.
आगामी हंगामातील पीक नियोजनासाठी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याच्या उपलब्धतेकडे लक्ष ठेवून आहेत. ऊस लागवडीसह रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि इतर पिकांची पेरणी करण्याची तयारी सुरू असताना कालव्याचे पाणी नेमके कोणत्या पिकांसाठी आणि किती क्षेत्रासाठी उपलब्ध होणार, याबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.
ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने लागवडीनंतर नियमित पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे ऊस लागवडीपूर्वी केवळ सुरुवातीचे पाणी उपलब्ध होणार आहे की नाही, एवढीच माहिती न देता पुढील आवर्तनांचेही नियोजन स्पष्ट करणे आवश्यक आहे. अशी मागणी रंजित शंकरराव गुजर यांनी केली आहे.
माहिती द्या
पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्यास पाणी सोडण्याची संभाव्य तारीख, आवर्तनाचा कालावधी, उपलब्ध पाण्याचे प्रमाण, किती क्षेत्राला पाणी मिळणार आहे, ऊस लागवडीसाठी किती क्षेत्राचा विचार करण्यात आला आहे तसेच गहू, हरभरा व इतर रब्बी पिकांसाठी किती पाणी नियोजन करण्यात आले आहे, याची स्पष्ट माहिती देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.