जालना ः शहरातील भोकरदन नाका परिसरातील रस्त्यावर आलेली अतिक्रमणे जेसीबीने हटविताना महापालिका कर्मचारी.  (छाया ः किरण खानापुरे)
जालना

Jalna Encroachment News : भोकरदन नाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम

धडक कारवाईने नागरिकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

जालना ः शहरातील भोकरदन नाका परिसरात महापालिकेच्यावतीने शनिवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा शनिवारी सहावा दिवस होता. शहरातील विविध भागात रस्त्यावर आलेली अतिक्रमणे महापालिकेच्यावतीने सलग सहाव्या दिवशी हटविण्यात आल्याने प्रमुख रस्ते मोकळे होत असल्याचे चित्र पाावयास मिळत आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

भोकरदन नाका परिसरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी दुकानदारांनी रस्त्यावर साहित्य ठेवले होते, तर काही ठिकाणी हातगाड्या व इतर तात्पुरती बांधकामे करण्यात आली होती.

यामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली होती. शनिवारी सकाळपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या पोलिस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. यासाठी जेसीबी, ट्रॅक्टर तसेच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा उपस्थित होता. अतिक्रमण हटविताना अतिक्रमणधारकांनी पंधरा दिवसात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी काही ठिकाणी रस्त्यावर आलेले ओटे व इतर बांधकाम पाडण्यात आले. दरम्यान, अतिक्रमण हटवल्यानंतर ती पुन्हा पूर्ववत होणार नाहीत याकडे महापालिकेने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. यासाठी नियमित पाहणी, दंडात्मक कारवाई आणि सतत निरीक्षण आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहर सुशोभीकरण आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी महापालिकेची ही मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कारवाई सुरूच

  • जालना महापालिकेची शहरात अतिक्रमण हटाव मोहीम 11 मे पासून सुरुवात झाली आहे. शनिवारी मोहिमेचा सहावा दिवस होता. शुक्रवारपर्यंत या मोहिमेत 148 दुकानांचे ओटे, पत्राचे शेड, अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले आहे.

  • महापालिका आयुक्त अंजली शर्मा, सहायक आयुक्त त्र्यंबक कांबळे, सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत अतिक्रमण विभागप्रमुख बी.सी.राठोड, सहायकप्रमुख सॅमसंग कसबे, स्वच्छता विभागप्रमुख नीलेश शंकरपेल्ली यांचा सहभाग आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT