

ईश्वरपूर : ईश्वरपूर नगरपरिषदेने शहरातील प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी आंबेडकर नाका ते कोकोस हॉटेल या रिंगरोडवरील फूटपाथवर असणारा राडारोडा व अनावश्यक साहित्य पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले. या धडक कारवाईमुळे अनेक वर्षांनंतर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.
शहरातील मुख्य रस्ते आणि फूटपाथवर अनधिकृतपणे टाकलेला राडारोडा आणि अनावश्यक साहित्य हटवण्यासाठी नगरपरिषदेने आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्तात गुरुवारी सकाळी आंबेडकर नाका येथून या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. नगरपरिषदेने यापूर्वीच जाहीर नोटीस आणि वैयक्तिक नोटिसा बजावल्या होत्या. नागरिक व व्यावसायिकांना दि. 8 मार्चपर्यंतची मुदत देऊन रस्त्यावरील साहित्य स्वतःहून हटवण्याचे आवाहन केले होते. आंबेडकर नाका ते कोकोस हॉटेल हा 60 फूट रुंदीचा मुख्य रस्ता असून, या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक ठिकाणी रस्ता व फूटपाथवर राडारोडा, विटा, दगड, माती आणि इतर साहित्य ठेवल्याने पादचाऱ्यांना, विशेषतः महिला, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना चालणे कठीण झाले होते. यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली होती. दिलेली मुदत संपल्यानंतरही संबंधित साहित्य न हटवल्याने गुरुवारी प्रशासनाने प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली. यामध्ये रस्ते आणि गटारीलगत साचलेला सर्व राडारोडा जप्त करण्यात येत आहे. वाहतुकीस अडथळा ठरणारे अनावश्यक साहित्य नगरपरिषदेच्या पथकाद्वारे उचलण्यात आले. हा संपूर्ण मार्ग आता रस्ते वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व मोकळा करण्यास सुरुवात केलेली आहे.
ही मोहीम सातत्याने राबवली जाणार आहे. तरी नागरिकांनी सार्वजनिक रस्ते व फूटपाथवर राडारोडा किंवा कोणतेही साहित्य टाकून अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.