ठळक मुद्दे
मराठवाड्यात होते हत्तींचे अस्तित्व
इतिहास पाहता जंगलतोडीमुळे हत्तींचे या भागातून कायमचे स्थलांतर
हत्तींचे पाषाण शिल्प हा अभ्यासाचाच विषय : बीड जिल्ह्यात अंबाजोगाईमध्ये हत्तीखाना
छत्रपती संभाजीनगर : उमेश काळे
मराठवाड्यात हत्तीला अनुकूल असा नैसर्गिक अधिवास नसल्यामुळे आता या भागात हत्तीचे अस्तित्व नसले तरी लेण्या, ऐतिहासिक ठिकाणी असलेले हत्तींचे शिल्प, हत्ती हौद, हत्तीवरून काढल्या जाणार्या मिरवणुकांचा इतिहास पाहता जंगलतोडीमुळे हत्तींचे या भागातून कायमचे स्थलांतर झाले असावे, असे म्हटले जाते.
कोल्हापूर येथील हत्तीणीचा विषय राज्यात सर्वत्र गाजत आहे. या पार्श्वभूमीवर विचार करता मराठवाडा हा काहीसा डोंगराळ, कमी वन्यक्षेत्र असलेला प्रदेश असल्याने या प्रदेशात हत्ती नसण्याची शक्यता अधिक आहे. हत्ती असल्याचा कोणताही दस्ताऐवज नाही. परंतु पूर्वीच्या काळात हत्तीला अनुकूल अशी व्यवस्था या भागात अनेक ठिकाणी असल्याने कालांतराने हत्तींनी कायमचे पलायन केले असावे असा एक तर्क आहे. विशेषत: हत्ती नसले तरी ऐतिहासिक स्थळांजवळ असणारे हत्तीहौद, शिल्प, उभ्या हत्तींचे पाषाण शिल्प हा अभ्यासाचाच विषय ठरतो. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात 1974 साली झालेल्या उत्खननात हत्ती, पाणघोडा, वाघ आदी प्राण्यांचे अवशेष मिळून आले. कार्बन कालमापनावरून ती 22 ते 24 हजार वर्षापूर्वींची असल्याचे अभ्यासकांना वाटते.
वेरूळ येथील ऐतिहासिक कैलास लेणे परिसरात दोन हत्ती आहेत. याशिवाय लेण्यातील काही शिल्पांतही हत्तीचे दर्शन घडते. अजिंठ्यात 17 क्रमांकाच्या लेणीवर हत्तीचे चित्र आहे. संभाजीनगजवळ असणार्या लेण्यांतही हत्तीचे शिल्प असले तरी लेण्यांवरील हत्ती स्थापत्य कलेचे दर्शन घडवितात, असे इतिहासकारांना वाटते.
देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणार्या हौदाला हत्ती हौद असे नाव आहे. 150 फूट लांब, 100 फूट रुंद आणि 23 फूट खोल असा हौद असून, त्याचा वापर देवगिरी किल्ल्यावर असणारे राजे हत्ती धुण्यासाठी करीत असत. तेराव्या शतकात यादवकालीन राजवटीत हत्ती हौदाची निर्मिती झाली. हौदातील पाण्याचा वापर लोकही वापरासाठी करीत असत.
बीड जिल्ह्यात अंबाजोगाईमध्ये प्राचीन लेणी आहेत. ती हत्तीखाना या नावाने ओळखली जाते, अशी माहिती इतिहास संशोधक डॉ. कामाजी डक यांनी दिली. इ. स. 1066मधे लेणीची निर्मिती झाली. हत्तीखाना लेणी, शिवलेणी गुहा, जोगाई मंडप किंवा जोगेश्वरी देवी लग्न मंडप अशी नावे या लेणीची आहेत. लेणी प्रवेशद्वाराजवळ खडकात कोरलेले हत्तीचे दोन भव्य पुतळे आहेत. त्यावरूनच या लेण्यांचे नाव हत्तीखाना असे पडले. . बहामनी काळात या जागेचा उपयोग हत्ती पाणी पिण्यासाठी करत होते, असेही संदर्भ सापडतात. लेणी मंडपाच्या आत साडेआठ चौरस मीटरचे प्रांगण असून चारही बाजूंना चार हत्ती आहेत. यातील एक हत्ती अपूर्णावस्थेत आहे.
पूर्वीच्या काळी होलिकोत्सव 20 - 20 दिवस चालत असत. निझाम राजवट असताना जालना शहरात 1889 पासून हत्ती वरून रेवडया उधळून रंग खेळण्याची परंपरा सुरू झाली. 136 वर्षापासूनची परंपरा अजूनही कायम आहे, परंतु आता जिवंत हत्ती ऐवजी लोखंडी हत्तीचा पुतळा उभा करून मिरविल्या जातो. हत्तीची मिरवणूक ज्या भागातून जाते, तेथील रंगोत्सव नंतर बंद करण्यात येतो.
ज्येष्ठ इतिहासकार सेतूमाधवराव पगडी यांनी आपल्या पुस्तकात नांदेडजवळील युध्दात हत्ती होते असा उल्लेख केला आहे. 1682-83 साली औरंगजेब जेंव्हा आपला मुलगा अकबर याचा बंड मोडण्यासाठी आणि मराठा स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत उतरला तेंव्हा स्वराज्यात घुसणार्या मोगली फौजांना मराठे प्रतिकार करीत होतेच पण स्वराज्याबाहेर पडून मोगली मुलखात ते कशा प्रकारचा धुमाकूळ घालत होते याच्या नोंदी अनेक समकालीन साधनात आल्या आहेत, त्यापैकी भीमसेन सक्सेनाच्या ग्रंथातील एक नोंद अशी आहे की
“ .. शहाजादा मुइजुद्दीन याने नांदेड येथे काही दिवस मुक्काम केला. नांदेडचा फौजदार रशीदखान ऊर्फ इल्हामुल्लाखान हा होता. तो येऊन शहाजाद्याला भेटला आणि त्याच्याबरोबर तो बीदरपर्यंत गेला. त्या दिवशीच बातमी आली ती ही - बादशहाचे आणि शहाजादा मुअज्जम याचे हत्ती चरण्यासाठी म्हणून पाथरी भागात ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर मराठ्यांनी हल्ला केला आहे. हे ऐकून बहादुरखानाने शहाजाद्याला बाजारबुणग्या सहित बीदरजवळ सोडले. तो निवडक सरंजाम घेऊन निघाला. इतक्यात बातमी आली की मराठ्यांनी हत्ती हाकलून नेले. बहादुरखान हा त्या वेळी नांदेड जिल्ह्यात लहसूना येथे होता. त्याने नांदेडचा फौजदार रशीदखान याजबरोबर आपले जड समान नांदेडकडे रवाना केले. नंतर त्याने मराठ्यांचा पाठलाग करून हत्ती सोडविले. मराठे पळून गेले. जाता जाता ते काही हत्ती बरोबर घेऊन गेले. बहादुरखानाने सापडलेले हत्ती जिल्ह्याच्या फौजदाराच्या हवाली केले. तो मराठ्यांच्या पाठलागावर निघाला. तुरुकचांदा (नांदेड जिल्ह्याला लागून आंध्र प्रदेशात) आणि गोवळकोंडा राज्याच्या सरहद्दीजवळ त्याने मराठ्यांना गाठून बाकीचे हत्ती सोडविले. यानंतर बहादुरखानाने बीदरजवळ कमठाण्याच्या तलावाच्या काठी मुक्काम केला'.
नळदूर्ग किल्ल्यावर हत्ती दरवाजा आणि हत्ती तोफ आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीरजवळ हत्तीबेट नावाचे ठिकाण असून या बेटाला पुरातन काळापासून महत्व आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामात या बेटावर स्वातंत्र्य सेनानींनी निजामाचा कब्जा होऊ दिला नसल्याची इतिहासात नोंद आहे. या ठिकाणी हत्तीला पकडण्यासाठी वास्तुरचना केली आहे. हे ठिकाण निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे.
आरोग्य दृष्ट्या विचार करता हत्तीरोगाचे सर्वाधिक रुग्ण नांदेड जिल्ह्यात आढळतात. या आजारात पाय हत्तीसारखे होतात.क्युलेक्स नावाच्या डासांमुळे हा रोग होतो. त्यामुळे जिल्ह्यात हत्तीरोग निर्मूलन मोहीम आरोग्य खात्याला राबवावी लागते.
डाॕ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पुरातत्व विभागाचे पहिले संचालक डाॕ. वि. ल. धारुरकर म्हणाले की, वेरुळच्या कैलास लेण्यात दोन मोठे दिग्गज हत्ती आहेत. वेरुळ लेणे हे गजराजाच्या पाठीवर उभे आहे. याशिवाय जैन लेणी क्रमांक ३२ येथेही कोरलेल्या इंद्रसभेत हत्ती आहे. तसेच गजलक्ष्मी अभिषेक करते असाही एक शिल्पपट आहे. राष्ट्रकुटाच्या सामर्थ्याचे प्रतिक म्हणून गजराज विराजमान आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.