Education officials closed down a school without a license
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन ते जालना रस्त्यावरील सोयगाव देवी फाट्यावर सुरू अस लेली संस्कार विद्या मंदिर ही अनधिकृत शाळा भोकरदन चे गट शिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर व त्यांच्या पथकाने भेट देऊन बंद केली आहे. विनापरवाना शाळा चालू करणाऱ्या संस्था चालकास एक लाख रुपये दंड तसेच शाळा सुरू असे पर्यंत प्रति दिवस दहा हजार रुपये याप्रमाणे दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.
भोकरदन जालना रोडवरील सोयगाव देवी फाट्याजवळ एका शेतात पत्र्याच्या शेड मध्ये संस्कार विद्या मंदिर या नावाने जिल्हा परिषद `चा बोगस युडायस क्रमांक नोंदवून बालवाडी पासून ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेमध्ये ५० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत होते.
दरम्यान याची माहिती भोकरदन चे गटशिक्षणाधिकारी कार्यालयास मिळाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर त्यांचे सहकारी शिक्षण विस्तार अधिकारी बडगे, केंद्रप्रमुख भुजंग यांनी अचानक या शाळेस भेट दिली.
यावेळी त्यांनी तेथे उपस्थित दोन महिला शिक्षकांकडून माहिती घेतली तपासणी दरम्यान त्यांच्याकडे शाळा सुरू करण्यासाठी लागणारी कुठलीही परवानगी मिळाली नसल्याचे निदर्शनास आले. गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर यांनी या अनाधिकृत शाळेचे प्रमुख बाबासाहेब सहाने (रा. सोयगाव देवी) यांनी अनाधिकृतपणे बनावट यु-डायस चा वापर करून परवानगी नसताना शाळा सुरू केल्याचे निदर्शनास आले.
भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी फाट्यावर सुरू केलेल्या अनधिकृत शाळा बंद करण्यात आली असून यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अधिकृत शाळेमध्ये प्रवेश घ्यावे अशा सूचना पालकांना गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फतही देण्यात आल्या आहे.