

पिंपळगाव रेणुकाई : येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. सध्या बाजारात शेवग्याने शंभरी गाठली असून, दोडकाही भाव खाऊन जात असल्याचे दिसून येत आहे.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील अनेक व्यापारी आणि ग्राहकांसह शेतकरी देखील खरेदी-विक्रीसाठी येथे मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे मंगळवारी भरणार्या आठवडे बाजारात कोटींची उलाढाल होते. येथील आठवडी बाजारामध्ये धनधान्यसह, भाजीपाला, किराणा, कपडे, पशुंचा बाजार यासारखी सर्व गोष्टींची उपलब्धता असते. त्यामुळे ग्राहकांचा वडा देखील मोठा आहे. सध्या शेतकरी पेरण्या करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे येथील बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये घटली.
गेल्या मंगळवारी भरलेल्या आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दराने मोठ्या प्रमाणात उच्चांकी गाठली. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे. भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळत आहे. बाजारामध्ये शेवग्याचा दर तर 100 रुपये किलो पर्यंत पोहोचला. तर दोडका आणि भोपळा 85 रुपये किलोने विक्री केल्या जात आहे. पिंपळगाव रेणुकाई येथे मंगळवारी मोठा आठवडी बाजार भरतो.
या मंगळवारी भरलेल्या आठवडे बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या जादा दराने विक्री झाला. परिणामी सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसला आहे. पुढील आठवड्यात भाजीपाल्याचे दर कमी होण्याची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.
सध्या बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पालक, भेंडी, शेवगा, वांगी, फुलकोबी आदींचे दर वधारले आहे. यामुळे सध्यातरी किचनमधून शेवगा हद्दपार झाला आहे.
दीपाली बेराड, गृहिणी, पिंपळगाव रेणुकाई