Manoj Jarange ED Complaint Warning
वडिगोद्री : अंतरवालीतील आंदोलनाला मदत करणाऱ्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात आहे. अशा कारवाईने मराठा आंदोलन मोडता येणार नाही, असा इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. तसेच जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. १९ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचल्यानंतर आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी अंतरवाली सराटी येथे सकल मराठा समाजाच्या बैठकीत केली.
मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई असल्याचे सांगत जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने मुंबईत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. ज्यांना मुंबईपर्यंत येणे शक्य नाही, त्यांनी मोर्चाच्या मार्गावर किमान १५० किलोमीटरपर्यंत सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल; मात्र आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
मोर्चाच्या मार्गावर पोलिसांनी बॅरिकेड्स लावू नयेत, अशी मागणीही जरांगे यांनी केली. तसेच मराठा समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने मुंबईला यावे, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांच्यापर्यंत आरक्षणाची मागणी पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकारला मुंबईपर्यंत चर्चा करण्यासाठी वेळ देत असल्याचे सांगत मागण्या मान्य करण्याची संधी अद्याप असल्याचे जरांगे म्हणाले. हैदराबाद गॅझेटियर, शपथपत्रे तसेच सातारा, कोल्हापूर व औंध गॅझेटियरसंदर्भातील मागण्यांचा प्रश्न मुंबईत जाऊन मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१५ सप्टेंबर : अंतरवाली सराटी ते पाटोदा (जि. बीड)
१६ सप्टेंबर : पाटोदा ते श्रीगोंदा (जि. अहिल्यानगर)
१७ सप्टेंबर : श्रीगोंदा ते हडपसर (पुणे)
१८ सप्टेंबर : हडपसर ते खोपोली (रायगड)
१९ सप्टेंबर : सकाळी १० वाजता मुंबईतील आझाद मैदानात प्रवेश आणि आमरण उपोषणास सुरुवात.