Drought is man-made and caused by foolish rulers
जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ हा मानवनिर्मित व मूर्ख राज्यकर्त्यांमुळेच निर्माण झाला असल्याची टीका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी येथे केली. मराठवाड्यातील गायरान प्रश्नी जेलभरो आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी केली.
येथील गोल्डी लॉन्स येथे शनिवारी (दि. 21) आयोजित रिपब्लिकन सेनेच्या 28 व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील आयोजित या सोहळ्यास अॅड. अमन आंबेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यास राष्ट्रीय महासचिव संजिव बौधनकर, केंद्रीय सदस्य प्रा. जगन्नाथ बाबा, प्रदेश उपाध्यक्ष यशवंत भालेराव, किरण घोंगडे, प्रदेश महासचिव विनोद काळे, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख अविनाश शिंदे आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आनंदराज आंबेडकर पुढे म्हणाले की, राज्यात भरपूर पाऊस पडतो, मात्र पाण्याचे नियोजन केले जात नाही, मूर्ख राज्यकर्त्यांमुळेच दुष्काळ निर्माण होत आहे. राज्यकर्ते जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत हा मानवनिर्मित दुष्काळ पडत जाणार आहे. दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणारे सरकार अस्तित्वात नसल्याची टीका त्यांनी केली.
गायरान प्रश्नी रिपब्लिकन सेनेच्या वतीने लवकरच जेलभरो आंदोलन करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. देशात गांधीवाद आला, मनूवाद आला, यापुढे आंबेडकरवाद येणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत सरकारच्या धोरणावरही त्यांनी टीका केली. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना अॅड. अमन आंबेडकर यांनी तरुणांनी पुढाऱ्यांच्या पाठीमागे न धावता शिक्षणाची वाट धरुन स्वाभिमानाने जीवन जगावे, असे आवाहन करतांना शासनाच्या धोरणावर टीका केली.
दुष्काळ निवारणासाठी तातडीने पाऊल उचला
गायरान जमिनी प्रत्यक्ष कसणाऱ्यांच्या नावे कराव्यात, दुष्काळी परिस्थितीवर शासनाने तातडीने उपाय योजना कराव्यात, पर्यावराणाचा -हास थांबवून त्यावर उपाय योजना कराव्यात, विविध आर्थिक विकास महामंडळातर्फे देण्यात आलेली बँकेची कर्ज तसेच मायक्रो फायन्सास कंपन्या व बचत गटांची कर्जे सरसकट माफ करण्यात यावी, आदी ठराव यावेळी संमत करण्यात आले. रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी यांनी ठरावाचे वाचन केले.