Drip irrigation sales shop vandalized
शहापूर, पुढारी वृत्तसेवा: अंबड तालुक्यातील शहापूर येथे ठिबक सिंचनचे दुकान फोडुन २१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. याच दुकानाशेजारी असलेले किराणा दुकानसुध्दा चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला.
शहापूरसह परिसरात गेल्या एक आठवड्यापासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. लहान मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने व्यापारी व नागरिक दहशतीमधे आहेत. चार दिवसांपूर्वीच भर दिवसा एका घराचे कुलूप तोडून ७० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा दुकान फोडण्याची घटना घडली आहे.
शहापूर येथील जालना वडिगोद्री राष्ट्रीय महामार्गवरील महेश वाल्हेकर यांचे श्री स्वामी समर्थ मशनरी अॅण्ड इरिगेशन हे दुकान मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शटर वाकवून फोडले. चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन कम्प्युटरची हार्ड डिस्क, जियो नेट फायबर कनेक्शन, ६ हजार रूपये किंमतीचे ४० किलो वायर, १२ हज ाराच्या १० इलेक्ट्रिक मोटार चे स्टार्टर, २ हजार ८८० रुपयांचे किसान टो स्टार्ट चे ८ नग असा २१ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी महेश वाल्हेकर यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांना चोरट्यांचे आव्हान
शहापूर परिसरात घरफोडी व दुकान फोडण्याच्या घटना घडत असतानाच पोलिस या घटनांचा तपास लावण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावून बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.